राज्यात २९ सप्टेंबरला एक हजार रोजगार मेळावे; युवकांनी सहभागी होण्याचे कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
महाराष्ट्रात २९ सप्टेंबर रोजी एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
राज्यात २९ सप्टेंबरला एक हजार रोजगार मेळावे
मुंबई, दि. २१ : राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या या रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद–२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळावे तसेच उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत जनजागृती करण्यात आली.
मलबार हिल येथील मीनल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष निंगेश कोरे, राजीव मेहता, सागर पेंढारक, आयेशा कुरेशी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भक्तगण यावेळी उपस्थित होते.
मुंबई शहर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याबाबत कौशल्य विकास अधिकारी विद्या शिंगे, समन्वयक अजय कांबळे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार महाकुंभाची माहिती दिली.
शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी
राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमधून स्थानिक युवकांना विविध आस्थापना आणि उद्योगांमधील रोजगाराच्या संधींबाबत माहिती मिळणार आहे.
यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि युवकांचे कौशल्य यांच्यातील समन्वय साधण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचीही जनजागृती
‘लोकसंवाद–२०२६’ अभियानातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचीही नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय तसेच इतर दुर्बल घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मॅट्रिकोत्तर, सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
तसेच स्वाधार आणि शासकीय वसतिगृह योजनांमधून निवास व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. रमाई आवास योजनेद्वारे घरकुलासाठी आर्थिक सहाय्य, तर मुख्यमंत्री वयोश्री आणि संजय गांधी निराधार योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींना सहाय्य दिले जाते.
या योजनांच्या माध्यमातून शिक्षण, निवास, आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा यांना बळ देऊन दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली.
महिला व बालकांसाठीच्या योजनांची माहिती
महिला व बालकांचे संरक्षण, पोषण, शिक्षण, सक्षमीकरण आणि पुनर्वसन यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना आणि सेवा राबविण्यात येतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, आदर्श अंगणवाडी, बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि पोषण अभियान यांसारख्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
अंगणवाडी सेवांच्या माध्यमातून पूरक पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच पोषणविषयक मार्गदर्शन दिले जाते. महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत समुपदेशन आणि कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. महिला हेल्पलाईन १५५२०९ आणि बाल हेल्पलाईन १०९८ याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सवातून थेट नागरिकांपर्यंत योजनांची माहिती
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने या संधीचा उपयोग करून शासकीय योजना आणि सेवांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
गणेश मंडळांच्या परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना रोजगाराच्या संधी, सामाजिक न्याय विभागाच्या योजना तसेच महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळत असल्याने ‘लोकसंवाद–२०२६’ उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एक हजार रोजगार मेळाव्यांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0