जलसंवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेतून जनजागृतीचा संदेश – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राज्यात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक येथे केले. ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’च्या माध्यमातून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश राज्यभर पोहोचवला जाणार आहे.
नाशिक ब्युरो
राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ या उपक्रमातून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. बैठकीस लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढविणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना बळकट करणे हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे.
२५ एप्रिलपासून जलयात्रेला प्रारंभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र चौंडी (जि. अहिल्यानगर) आणि गोदावरीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून २५ एप्रिल २०२६ रोजी एकाच वेळी जलयात्रेला प्रारंभ होणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून चौंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जलयात्रेचा मार्ग
चौंडी येथून निघालेली यात्रा अहिल्यानगर येथे मुक्काम करेल.
त्र्यंबकेश्वर येथून निघालेली यात्रा नाशिक, सिन्नर, संगमनेर मार्गे २६ एप्रिल रोजी शिर्डी येथे पोहोचेल.
२७ एप्रिल रोजी शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगरजवळील घृष्णेश्वर येथे मुक्काम असेल.
२८ एप्रिल रोजी यात्रा कन्नड, चाळीसगाव आणि धुळे येथे पोहोचेल.
२९ एप्रिल रोजी धुळे ते महेश्वर (मध्य प्रदेश) असा प्रवास करून जलयात्रेचा समारोप होईल.
आरोग्य, सुरक्षा आणि पाणीपुरवठ्याच्या सूचना
उन्हाची तीव्रता लक्षात घेता उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाने रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व ओआरएस पॅकेट्सची उपलब्धता ठेवावी. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करावे, तसेच सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी मोठी योजना
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री विखे पाटील यांनी गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त आणि नदीपात्र स्वच्छतेसाठी मोठ्या उपाययोजना केल्या जाणार असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विस्तृत आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या जलयात्रेमुळे राज्यातील जलसंवर्धन चळवळीला नवे बळ मिळेल आणि पाणी वाचविण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0