गडचिरोलीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगामपूर्व कार्यशाळा उत्साहात; सेंद्रिय शेतीचा संदेश

गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी खरीप हंगामपूर्व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करण्याचे आवाहन करण्यात आले.

Apr 24, 2026 - 22:46
 0  2
गडचिरोलीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगामपूर्व कार्यशाळा उत्साहात; सेंद्रिय शेतीचा संदेश
गडचिरोलीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगामपूर्व कार्यशाळा

गडचिरोली | दि. २४ (जिमाका)

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPC) एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळा २०२६ उत्साहात पार पडली. आगामी खरीप हंगामाचे नियोजन, हवामान बदल आणि शाश्वत शेती पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती प्रीती हिरळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ उभी करण्याचे आवाहन केले.

त्या म्हणाल्या की, युरिया व डीएपी (DAP) सारख्या रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी सेंद्रिय व स्वनिर्मित खतांचा वापर वाढवावा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करावा. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एल निनो सारख्या परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बांबू, सीताफळ, शेवगा यांसारख्या फळझाडांची लागवड तसेच तूर, उडीद यांसारख्या डाळवर्गीय पिकांकडे वळावे, असेही त्यांनी सांगितले.

तांत्रिक सत्रात मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र (KVK) सोनपूरचे विषय विशेषज्ञ डॉ. प्रीतम गिरडे यांनी सेंद्रिय पीक पद्धती, भात पिकात हिरवळीची खते, कमी व मध्यम कालावधीच्या वाणांची निवड याबाबत मार्गदर्शन केले.

भात लागवडीसाठी पट्टा पद्धत, DSR (थेट पेरणी) पद्धत आणि अझोला वापर याविषयीही त्यांनी माहिती दिली.

डॉ. पुष्पक बोथीकर यांनी रासायनिक व सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापनाची माहिती दिली. जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (BIRC) निर्मित निविष्ठांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतीसोबत सेवा उद्योग उभारा

MCDC चे विभागीय व्यवस्थापक दीपक बेदरकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता सेवा उद्योग उभारावेत, असे सांगितले.

यामध्ये कृषी निविष्ठा केंद्र, सल्ला केंद्र, शेतमाल तारण योजना, गोदाम उभारणी तसेच स्प्रे पंप, बारदाना, ताडपत्री यांसारख्या साहित्याचे वितरण यांचा समावेश असावा, असे त्यांनी नमूद केले.

मृदा परीक्षणाचे महत्त्व

जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद परीक्षण अधिकारी किशोर चौधरी यांनी मृदा परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामस्तरीय प्रयोगशाळांमार्फत शेतकऱ्यांनी माती तपासणी सेवा घ्यावी, असे आवाहन केले.

या कार्यशाळेमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरीप हंगामासाठी दिशा मिळाल्याचे सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0