भाजप नगरसेवकांनी प्रभागातील कामांवर लक्ष द्यावे – सुनील केदार
नाशिक महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विकासकामांमधील अनियमितता दूर करण्यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात लक्ष देऊन तक्रारी सोडवाव्यात, असे आवाहन सुनील केदार यांनी केले आहे.
नाशिक ब्यूरो-: नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ७२ जागा मिळवत पुन्हा एकदा बहुमताने सत्ता मिळाली आहे. जरी पक्षाने १०० प्लसचा नारा दिला होता, तरी काही राजकीय समीकरणांमुळे अपेक्षित निकाल मिळू शकला नाही. मात्र, निवडून आलेल्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा आहेत.
चार वर्षांपासून महानगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळे नागरिकांना स्थानिक लोकप्रतिनिधींची कमतरता जाणवत होती. आता नगरसेवक उपलब्ध झाल्याने नागरिक आपल्या समस्या आणि अडचणी थेट मांडत आहेत.
या पार्श्वभूमीवर अध्यक्ष Sunil Kedar यांनी नगरसेवकांना आवाहन करत सांगितले की, प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवावे. सध्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी, रस्ते, गटार, रिंग रोड, वीज आणि आरोग्य क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. मात्र या कामांमध्ये काही ठिकाणी अनियमितता दिसून येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
ठेकेदारांनी कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावी, अन्यथा अशा कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
माध्यमांमध्ये नगरसेवकांविषयी येणाऱ्या चुकीच्या बातम्यांमुळे शहरात गैरसमज निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. नगरसेवकांवर आरोप करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक प्रभागात सुमारे ४० हजार मतदार असल्याने नगरसेवकांना नागरिकांना उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे ठेकेदारांनी आपली जबाबदारी ओळखून कामे पार पाडावीत आणि नगरसेवकांना बदनाम करण्याचे प्रयत्न टाळावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0