लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ यशस्वी करूया – मंत्री हसन मुश्रीफ
कागल येथे हिरण्यकेशी व चिकोत्रा नद्यांच्या पाण्याचे कलशपूजन करत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान लोकसहभागातून यशस्वी करण्याचे आवाहन केले. जलसंवर्धन व शाश्वत पाणी नियोजनाचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
कागल | दि. २४ (जिमाका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन आणि जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या नावाने राबविण्यात येत असलेले ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान लोकसहभागातून यशस्वी करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा, जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमेअंतर्गत कागल येथे हिरण्यकेशी आणि चिकोत्रा नद्यांच्या पाण्याचे कलशपूजन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे १५ ते ३० एप्रिल या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ होणार आहे.
या जलयात्रेतून जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जनजागृती मोहीम राबवून जलसमृद्ध महाराष्ट्राचा संकल्प केला जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी महेश्वर (मध्यप्रदेश) असा या यात्रेचा प्रवास राहणार आहे.
वारसा जलसंवर्धनाचा
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात विहिरी, तलाव, घाट आणि कालव्यांची निर्मिती करून जलसंवर्धनाचा आदर्श निर्माण केला. शेतीसाठी सक्षम सिंचन व्यवस्था उभारणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करणे आणि लोकसहभागातून जलसंधारण चळवळ उभारणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
हा पंधरवडा केवळ जनजागृतीपुरता नसून पाणी वाचवण्याचा संदेश देणारा आणि शाश्वत जलव्यवस्थापनाची जाणीव करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांनी केले. यावेळी उपविभागीय अभियंता गणेश मगदूम, अविनाश फडतारे, सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता एम. के. चव्हाण, तसेच विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0