ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ; एक कोटी हस्तलिखितांची नोंदणीचे उद्दिष्ट
भारत सरकारच्या ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. देशभरातील एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध, नोंदणी, डिजिटायझेशन आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई/कोल्हापूर, दि. २५ : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी भारत सरकारने ‘ज्ञानभारतम्’ प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ केला आहे. संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात १६ मार्च २०२६ पासून करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करणे हा आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.
महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे, आनंद आश्रम संस्थान, पुणे तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे या संस्था क्लस्टर व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत.
राज्यासाठी पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक सुजितकुमार उगले हे राज्य नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असून अंजली ढमाळ या सहनोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.
या सर्वेक्षणासाठी ‘Gyan Bharatam’ हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
या मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि वारसा संवर्धन संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांकडे जुनी हस्तलिखिते असल्यास त्याची माहिती ‘ज्ञानभारतम्’ मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0