जागतिक हिवताप दिन : ‘मलेरियामुक्त’ भविष्यासाठी कटिबद्ध होऊया!

२५ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक हिवताप दिनानिमित्त मलेरिया प्रतिबंध, वेळेत निदान, उपचार आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. २०३० पर्यंत भारताला मलेरियामुक्त करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे.

Apr 24, 2026 - 15:38
 0  8
जागतिक हिवताप दिन : ‘मलेरियामुक्त’ भविष्यासाठी कटिबद्ध होऊया!
जागतिक हिवताप दिन, मलेरिया दिन

प्रतिवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक हिवताप (मलेरिया) दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मलेरियासारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती करणे, रोगाचा प्रसार रोखणे तसेच वेळेत निदान आणि उपचारांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि अस्वच्छतेमुळे कीटकजन्य व जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मलेरिया हा केवळ ताप नसून तो वेळेत उपचार न झाल्यास जीवघेणाही ठरू शकतो. विशेषतः भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते.

चालू वर्षातील आकडेवारीनुसार, कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण ४० मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत.

मलेरियाचा प्रसार कसा होतो, याचा शोध ब्रिटीश वैज्ञानिक सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये सिकंदराबाद येथे लावला. त्यांनी ‘ॲनोफिलीस’ जातीच्या मादी डासामुळे मलेरिया पसरतो हे सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना १९०२ मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

मलेरियाची प्रमुख लक्षणे म्हणजे थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा. योग्य वेळी निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

मलेरिया टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय :

घराभोवती पाणी साचू देऊ नका

कुलर, टायर, डबे, टाक्या स्वच्छ ठेवा

पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा

मच्छरदाणीचा वापर करा

डास प्रतिबंधक क्रीम वापरा

ताप आल्यास त्वरित तपासणी करा

महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने सन २०३० पर्यंत देशाला मलेरियामुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. राज्यात ‘ग्राम समृद्ध अभियान’ आणि ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत.

या वर्षीचे घोषवाक्य ‘हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे’ असे आहे. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून आणि डासांपासून संरक्षण करून मलेरियामुक्त भारत घडवण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

— डॉ. संजय रणवीर (सहाय्यक संचालक, हिवताप, कोल्हापूर विभाग)

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0