भुंगे पकडा, हुमणी रोखा! उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात किड नियंत्रण स्पर्धा

कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामापूर्वी हुमणी कीड नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा जाहीर. २७ एप्रिल ते १० जूनदरम्यान भुंगे पकड मोहिम राबवून शेतकऱ्यांना बक्षिसे व मार्गदर्शन दिले जाणार.

Apr 25, 2026 - 20:27
 0  2
भुंगे पकडा, हुमणी रोखा! उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात किड नियंत्रण स्पर्धा

कोल्हापूर, दि. २५ : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा उपक्रम म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने 'हुमणी कीड नियंत्रण जिल्हास्तरीय स्पर्धा' जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही स्पर्धा राबवली जाणार असून, हुमणी या पिकांसाठी घातक किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना देण्याचा उद्देश आहे.

हा उपक्रम पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून, शेतीतील उत्पादनवाढ आणि नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारी किड असल्यामुळे ऊस, भात, मका, भाजीपाला यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

पावसाच्या पहिल्या सरीनंतर संध्याकाळच्या वेळेत जमिनीतून बाहेर पडणारे भुंगे हेच हुमणीच्या वाढीचे मूळ असतात. या भुंग्यांना वेळीच पकडून नष्ट केल्यास पुढील पिढी तयार होण्यापासून रोखता येते. त्यामुळेच 'भुंगे पकडणे' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचा कालावधी २७ एप्रिल २०२६ ते १० जून २०२६ असा निश्चित करण्यात आला असून, सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 'प्रकाश सापळे' किंवा 'कामगंध सापळे' वापरणे अनिवार्य आहे. पकडलेले भुंगे दररोज मोजून संबंधित कृषी कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.

स्पर्धेच्या शेवटी प्रत्येक तालुक्यातून सर्वाधिक भुंगे जमा करणाऱ्या ५० शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांमार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0