आरक्षणाचे तुकडे करून समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव उधळून लावू – अ‍ॅड. अमन आंबेडकर

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अ‍ॅड. अमन आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सरकारवर टीका केली. समाजात फूट पाडण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

Apr 25, 2026 - 17:05
 0  17
आरक्षणाचे तुकडे करून समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव उधळून लावू – अ‍ॅड. अमन आंबेडकर
यवतमाळ, रिपब्लिकन सेना

रवि वाघमारे | यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ : राज्यातील विद्यमान सरकारने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा घेतलेला निर्णय हा बहुजन समाजात फूट पाडण्याचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अ‍ॅड. अमन आंबेडकर यांनी केला. हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा घणाघाती इशाराही त्यांनी दिला.

महागाव येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी उपस्थित होते.

सरकारवर गंभीर आरोप

अ‍ॅड. अमन आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची मानसिकता विभाजनवादी असून अनुसूचित जातीतील ५९ जातींचे वर्गीकरण करून अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे. मात्र सरकार राजकीय स्वार्थासाठी त्यात हस्तक्षेप करत आहे. आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचा प्रकार असून तो सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयोगाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह

डॉ. सुशील सूर्यवंशी यांनीही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आरक्षण उपवर्गीकरणाबाबत आयोगाचा अहवाल अद्याप जनतेसमोर जाहीर करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत हरकती मागवणे हा चुकीचा प्रकार आहे.

मातंग समाज आमचा भाऊ आहे आणि त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

राजकीय आरक्षणाची मागणी

आरक्षणाचा लाभ केवळ नोकरी आणि शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता तो विधानपरिषद, राज्यसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अनुसूचित जाती प्रवर्गात फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही नेत्यांनी दिला.

मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, विदर्भ अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, आयोजक सुनील पाटील चिंचोळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0