करिअर निवडताना आवड आणि कौशल्याचा विचार करा; पालकांनी मुलांचे मित्र व्हावे – डॉ. शितलकुमार रवंदळे, व्ही. एस. काळभोर

आकुर्डी येथे खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पीसीईटीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दहावी-बारावीतील गुणवंत, अनाथ आणि मूकबधिर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Jun 9, 2026 - 03:09
 0  3
करिअर निवडताना आवड आणि कौशल्याचा विचार करा; पालकांनी मुलांचे मित्र व्हावे – डॉ. शितलकुमार रवंदळे, व्ही. एस. काळभोर
आकुर्डीत गुणवंत विद्यार्थी सत्कार; करिअर निवडताना आवड आणि कौशल्याला प्राधान्य द्या

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना केवळ गुणांचा विचार न करता स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्य यांचा सखोल अभ्यास करावा. तसेच निवडलेल्या क्षेत्रात रोजगार आणि व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती घेणे आवश्यक असल्याचे मत पीसीईटी प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी व्यक्त केले. तर पालकांनी मुलांवर स्वतःची मते लादण्याऐवजी त्यांचे मित्र बनून त्यांना योग्य दिशा द्यावी, असे आवाहन पीसीईटीचे सचिव व्ही. एस. काळभोर यांनी केले.

आकुर्डी येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवनमध्ये खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, अनाथ आणि मूकबधिर विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला पीसीईटीचे सचिव व खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व्ही. एस. काळभोर, ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर, माजी उपमहापौर शर्मिला बाबर, माजी उपमहापौर दिनकरराव दातीर पाटील, कला-क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे, शंकराव पांढरकर, विजय काळभोर, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विजय कोळपकर, विनायक काळभोर, रोहन मुळे तसेच ट्रस्टचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दहावी परीक्षेत वेदांत दाभाडे यांनी 99 टक्के, अद्विका डागलिया हिने 97 टक्के आणि बारावीमध्ये गायत्री कुंभार हिने 96 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना सायकल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय दहावी आणि बारावी परीक्षेत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या 350 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पियुष आणि आयुष फुले या दोन अनाथ विद्यार्थ्यांसह निगडी येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहावे

डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, करिअर निवडताना त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी संवाद साधावा, त्यांचे अनुभव जाणून घ्यावेत आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे. कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यामध्ये सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक सेमिस्टरमध्ये प्रकल्प (प्रोजेक्ट) करणे आणि शिक्षणासोबत ऑफलाइन किंवा ऑनलाइन इंटर्नशिप करणे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

पालक-मुलांमध्ये संवाद आवश्यक

व्ही. एस. काळभोर यांनी सांगितले की, मुलांच्या वाढत्या वयात पालकांनी त्यांचे मित्र बनणे गरजेचे आहे. पालक आणि मुलांमधील सुसंवाद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरतो. पीसीईटी संस्था केजी ते पीजी शिक्षण क्षेत्रात अग्रणी असून आज संस्थेमध्ये सुमारे 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ट्रस्टचे योगदान

खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर यांनी ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, मागील तीन वर्षांपासून ट्रस्ट आणि पीसीईटी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम आयोजित केला जात आहे. ट्रस्टने वैद्यकीय शिबिरे, मोफत विवाह सोहळे यांसारखे सामाजिक उपक्रम राबविले असून लवकरच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे.

कैलास कुटे यांनी खंडोबा देवस्थान ट्रस्टची शंभर वर्षांची परंपरा अधोरेखित करत धार्मिक कार्यासोबतच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ट्रस्टने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विठ्ठल रामचंद्र काळभोर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश काळभोर आणि गणेश दातीर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष तरटे यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0