पिंपरी-चिंचवडमध्ये “हरित व आत्मनिर्भर शहर” संकल्पनेची सुरुवात; महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत “हरित व आत्मनिर्भर शहर” अभियान राबविण्यात येणार आहे. महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि हरित जीवनशैलीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १६ :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक वाहतूक आणि स्वदेशी उत्पादनांच्या वापराच्या आवाहनाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांना प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत “हरित व आत्मनिर्भर शहर” संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापौर रवि लांडगे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे सूचना देत प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, शाळा, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
या अभियानामुळे शहरात ऊर्जा बचत, इंधन बचत, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी उत्पादनांना चालना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजातही पर्यावरणपूरक आणि खर्च बचतीच्या पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत “हरित पिंपरी-चिंचवड आठवडा”, “नो पॉवर अवर”, “एक कर्मचारी – एक वृक्ष”, ई-वाहन व चार्जिंग स्टेशन प्रोत्साहन, “वर्क फ्रॉम होम / व्हर्च्युअल मीटिंग” धोरण, “स्वदेशी बाजार – आत्मनिर्भर पीसीएमसी”, पेपरलेस प्रशासन, “ऑईल फ्री हेल्दी कॅन्टीन”, “सौर पिंपरी-चिंचवड” अभियान, “ग्रीन रेटिंग” स्पर्धा, “सायकल टू वर्क डे”, नैसर्गिक शेती व टेरेस गार्डन प्रोत्साहन तसेच “हरित गणेशोत्सव / हरित उत्सव” यांसारखे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश हा केवळ शासनाचा उपक्रम नसून तो प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून जनआंदोलन व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवड शहर विकासासोबत पर्यावरण संरक्षणातही राज्यात आदर्श निर्माण करेल.”
या उपक्रमामुळे शहरात हरित ऊर्जा वापराला चालना मिळणार असून प्रदूषण नियंत्रण, वृक्षसंवर्धन, इंधन बचत, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर “स्मार्ट”, “ग्रीन” आणि “सस्टेनेबल” शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

