शीव रेल्वे पुलाचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; महापौर रितू तावडे यांची पाहणी

शीव स्थानकाजवळील ११२ वर्षे जुना रेल्वे पूल पुनर्बांधणीच्या अंतिम टप्प्यात असून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महापौर रितू तावडे यांनी पाहणी करून दर्जेदार फिनिशिंग, हिरवळ आणि व्हर्टिकल गार्डनच्या सूचना दिल्या.

Sep 3, 2026 - 22:36
 0  7
शीव रेल्वे पुलाचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; महापौर रितू तावडे यांची पाहणी
शीव रेल्वे पूल, सायन रेल्वे पूल, रितू तावडे, मुंबई महापौर, BMC, मुंबई महानगरपालिका, रेल्वे पूल पुनर्बांधणी, Sion Railway Bridge, MUTP-2, मुंबई पूल प्रकल्प, शीव स्थानक, सायन स्थानक, व्हर्टिकल गार्डन, मुंबई विकासकामे

प्रतिनिधी:नरेश शिंदे 

११२ वर्षे जुना असुरक्षित पूल पुनर्बांधणीच्या अंतिम टप्प्यात; परिसरात हिरवळ व व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याच्या सूचना

मुंबई, दि. ३ सप्टेंबर २०२६ : शीव (सायन) स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाची मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाहणी केली. पुलाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या सोयीचा विचार करून प्रकल्प निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती गती कायम ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

३० सप्टेंबरपर्यंत पूल सुरू करण्याचे नियोजन

शीव स्थानकाजवळील हा पूल तब्बल ११२ वर्षे जुना असून तो असुरक्षित ठरल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. निविदेनुसार प्रकल्पाची मुदत फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेसोबत समन्वय साधून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूल पूर्ण करून शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दोन्ही गर्डरचे डेक स्लॅब काँक्रिटीकरण पूर्ण

मध्य रेल्वेमार्फत पुलाच्या दोन्ही गर्डरवरील काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही गर्डरच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून सध्या क्रॅश बॅरिअर आणि काँक्रिट वेअरिंग कोटचे काम सुरू आहे.

मध्य रेल्वेमार्फत नवीन पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच, जुन्या पुलाच्या उर्वरित भागाचे निष्कासनही पूर्ण झाले आहे.

MUTP-2 अंतर्गत अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी पुनर्बांधणी

मध्य रेल्वेमार्फत मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या (MUTP-2) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी अतिरिक्त रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी शीव स्थानकाजवळील जुन्या पुलाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे.

रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत, तर महानगरपालिका हद्दीतील पोहोचमार्गाचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून केला जात आहे.

ऑगस्ट २०२४ पासून पूल वाहतुकीसाठी बंद

वाहतूक पोलीस विभागाच्या ना-हरकत परवानगीनुसार १ ऑगस्ट २०२४ पासून अस्तित्वातील पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. स्थानिक नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी पुनर्बांधणीचे काम दोन टप्प्यांत हाती घेण्यात आले.

पहिल्या टप्प्यात पुलाच्या उत्तरेकडील भागाचे निष्कासन करण्यात आले, तर दक्षिणेकडील भाग पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात आला होता. आता उर्वरित जुन्या पुलाचे निष्कासन पूर्ण झाले आहे.

दोन भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुले

महानगरपालिकेमार्फत पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग (धारावी) दरम्यान पोहोचमार्गाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे.

पादचाऱ्यांच्या सोयीसाठी लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे नवीन भुयारी मार्ग बांधण्यात आला असून तो २० फेब्रुवारी २०२६ रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आला. तसेच संत रोहिदास मार्ग येथील भुयारी मार्गाचे पुनर्बांधकाम पूर्ण करून तो १४ जुलै २०२६ रोजी सुरू करण्यात आला आहे.

पुलाच्या परिसरात हिरवळ व व्हर्टिकल गार्डनचा विचार

पाहणीदरम्यान महापौर रितू तावडे यांनी प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. अंतिम कामे म्हणजेच फिनिशिंग उच्च दर्जाची असावीत, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच पुलाच्या दुभाजकांवर हिरवळ विकसित करण्यासोबतच पुलाच्या दोन्ही बाजूंना व्हर्टिकल गार्डनसारखे पर्यावरणपूरक पर्याय तपासावेत, असे निर्देश महापौरांनी दिले. यामुळे पुलाचा परिसर अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

पाहणीवेळी अधिकारी उपस्थित

या पाहणीवेळी एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती मानसी सातमकर, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रमुख अभियंता राजेश मुळे यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती आणि कामाच्या प्रगतीची माहिती महापौरांना दिली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.