मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्यपदासाठी अर्ज मागविले

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर २०२६ आहे.

Sep 17, 2026 - 17:40
 0  7
मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्यपदासाठी अर्ज मागविले
मुंबई महानगरपालिका, BMC, वृक्ष प्राधिकरण, नामनिर्देशित सदस्य, वृक्ष संवर्धन, वृक्ष संरक्षण, पर्यावरण,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

वृक्ष प्राधिकरणाच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी अर्ज मागविले

मुंबई, दि. १७ सप्टेंबर २०२६ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम ३(३) अन्वये ही नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत, म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज साद करणे आवश्यक आहे.

कृषी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, उद्यानविद्या, वृक्षशास्त्र (आर्बोरिकल्चर), वनशास्त्र किंवा तत्सम क्षेत्रातील पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

तसेच वृक्षारोपण, वृक्षांचे जतन व संवर्धन क्षेत्रात अनुभव असलेले अशासकीय संस्थांमधील तज्ज्ञ, राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत अशासकीय संस्थांचे सक्रिय सदस्य आणि सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांनाही या पदासाठी अर्ज करता येणार आहे.

किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक

अर्जदारास वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संरक्षण या क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अशासकीय संस्था, महानगरपालिका किंवा अन्य प्राधिकरणांमध्ये पर्यावरणीय क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच वरील दोन्ही प्रकारच्या पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदार हा बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक

इच्छुक उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक अर्हता, अनुभवाचा तपशील आदी माहिती नमूद करावी. सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय आस्थापनेचे नाव व पत्ता तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेला हुद्दा नमूद करणे आवश्यक आहे.

अशासकीय संस्थेचे सदस्य असलेल्या उमेदवारांनी संबंधित संस्थेचे नाव आणि सदस्यत्वाचा तपशील द्यावा. शैक्षणिक अर्हता, अनुभव तसेच आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अशासकीय संस्थेतील सदस्यत्वाचा पुरावा संबंधित संस्थेच्या लेटरहेडवर असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे सादर करायचा?

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज पुढील पत्त्यावर सादर करावेत :

उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांचे कार्यालय,

दुसरा मजला, पेंग्विन बिल्डिंग,

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय,

संत सावता माळी मार्ग, भायखळा (पूर्व),

मुंबई – ४०००२७.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर २०२६ असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.

उच्च न्यायालयातील PIL च्या निर्णयासापेक्ष नियुक्ती

वृक्ष प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती मा. उच्च न्यायालयातील PIL 46 of 2015 च्या अंतिम निर्णयासापेक्ष राहणार आहे. तसेच हे नामनिर्देशन तात्पुरत्या स्वरूपाचे असून त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक राहणार असल्याचे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.