राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ; झाडू घेऊन राज्यपालांनी केली मार्गिकेची स्वच्छता
मुंबईतील इस्कॉन, जुहूतर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. राज्यपालांनी भगवान जगन्नाथांची आरती करून रथयात्रा मार्गिकेची झाडूने स्वच्छता करत स्वच्छतेचा संदेश दिला.
मुंबई | प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबईतील इस्कॉन, जुहूतर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला शनिवारी (दि. १८) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. अंधेरी येथील भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कूल येथून निघालेल्या रथयात्रेदरम्यान राज्यपालांनी रथावर विराजमान भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या प्रतिमांची आरती केली. तसेच झाडू हाती घेत रथयात्रेच्या मार्गिकेची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, जगन्नाथ रथयात्रा हा सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीतील एकमेवाद्वितीय आध्यात्मिक अनुभव आहे. या उत्सवानिमित्त भगवान जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडून भक्तांच्या भेटीसाठी येतात. पूर्वी जगन्नाथ पुरी आणि काही मोजक्या ठिकाणी साजरा होणारा हा उत्सव इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी जगभर पोहोचवला, असे त्यांनी सांगितले.
'जो इतरांचे दुःख आणि कष्ट जाणतो तोच खरा वैष्णव,' असे सांगत राज्यपालांनी भक्तीला कृतीची जोड दिल्यास ती ईश्वरीय सेवा ठरते, असे प्रतिपादन केले. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य भक्तिभावाने केल्यास ते समाजसेवेत रूपांतरित होते. गीत, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातूनही श्रीकृष्ण भक्ती व्यक्त केली जाऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी मूल्ये आणि भक्तिभाव अधिक महत्त्वाचा असल्याचे सांगत राज्यपालांनी इस्कॉनच्या जागतिक कार्याची प्रशंसा केली. वयाच्या सत्तराव्या वर्षी अमेरिकेत जाऊन श्रील प्रभुपाद यांनी जगभर हरे कृष्ण महामंत्राचा प्रसार केला, याची त्यांनी विशेष दखल घेतली.
यावेळी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईकरांना जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेचा आध्यात्मिक अनुभव उपलब्ध करून दिल्याबद्दल इस्कॉनचे आभार मानले.
खासदार हेमा मालिनी यांनी रथयात्रा ही भक्ती, शक्ती, प्रेम आणि करुणेचे प्रतीक असल्याचे सांगत, नृत्यसाधनेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाशी जोडले जाण्याचा आनंद व्यक्त केला.
अंधेरी येथून सुरू झालेली ही रथयात्रा जुहू येथील इस्कॉन मंदिरात समाप्त होणार आहे.
या प्रसंगी आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. सूरदास, इस्कॉन जुहूचे अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1