कालिदास नाट्यगृह ट्रस्टच्या पुनर्रचना आणि आधुनिकीकरणासाठी संयुक्त बैठक संपन्न
मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाच्या ट्रस्ट पुनर्रचना, व्यवस्थापन सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी किरीट सोमय्या यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नाट्यगृहाला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे: मुलुंडच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या भविष्यातील प्रगती, व्यवस्थापन सुधारणा आणि ट्रस्ट पुनर्रचनेसंदर्भात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विशेष पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत कालिदास नाट्यगृहाचा दर्जा उंचावणे, आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच ट्रस्टच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला.
यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार मिहिर कोटेचा, माजी खासदार मनोज कोटक, भाजप ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, प्रभाग समिती अध्यक्षा साक्षी दीपक दळवी, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका दीपिका घाग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी मुलुंडमधील रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली कालिदास नाट्यगृहाचा सांस्कृतिक वारसा अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कालिदास नाट्यगृह हे मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. त्यामुळे त्याच्या पुनर्रचना आणि सुधारणा प्रक्रियेमुळे स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था आणि प्रेक्षकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0