महा वॉकेथॉनमधून जलसंपन्न महाराष्ट्रासाठी एक पाऊल; राज्यभरातून तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग
जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग; माती व पाणी संवर्धनाचा संदेश.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबई, दि. २१ : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आदर्श घेत त्यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील या उपक्रमाला तीन लाखांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुंबईतील वरळी परिसरातील सागर पॉईंटजवळ आयोजित राज्यस्तरीय महा वॉकेथॉनच्या कार्यक्रमात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, “महा वॉकेथॉनच्या माध्यमातून माती आणि पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच जलसंपन्न महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमास विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, गायक संजू राठोड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा’
मंत्री संजय राठोड म्हणाले की, ‘माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन राज्यभर महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर केवळ मंत्रालयात बैठका किंवा सभागृहातील कार्यक्रम घेण्याऐवजी थेट नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय विभागाने घेतला.
माती आणि पाणी हे महाराष्ट्राच्या भवितव्याशी जोडलेले अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी जलसंधारणाच्या या चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ती अधिक व्यापक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सुधाकरराव नाईक यांचे जलसंधारणातील योगदान अधोरेखित
स्व. सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला व्यापक लोकचळवळीचे रूप दिले. त्यांच्या दूरदृष्टीतून जलसंधारणाच्या क्षेत्रात झालेल्या कामांचा आदर्श घेऊन भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचे संवर्धन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.
‘महा वॉकेथॉन’ अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम
विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी महा वॉकेथॉनचे कौतुक केले. माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा ही संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा
उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविण्याची गरज आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये मिळालेला प्रतिसाद हा भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची मोठी लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.
लोकसहभागातून जल व मृदसंधारणाला बळ
मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले. पावसाचे पाणी वाहून जात असताना त्यासोबत सुपीक मातीदेखील वाहून जाते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे माती आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. स्व. सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली. त्यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचेही इंद्रनील नाईक यांनी सांगितले.
जलपूजन, शपथ आणि महा वॉकेथॉनचा शुभारंभ
राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा शुभारंभ आरे दुग्ध वसाहतीजवळील सागरी किनारा रस्त्यालगतच्या प्रोमेनेड येथून करण्यात आला. प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून जलपूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांना माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी शपथ देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.
अभिनेता, क्रिकेटपटू आणि कलाकारांचाही सहभाग
या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. अभिनेते पुष्कर श्रोत्री, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संगीतकार संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख, गायक संजू राठोड यांच्यासह विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले.
जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
तीन किलोमीटर अंतर नागरिकांसोबत पायी पूर्ण
महा वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी संपूर्ण तीन किलोमीटर अंतर सहभागींसोबत पायी चालून पूर्ण केले. त्यांच्यासोबत विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर तसेच अन्य विभागांचे सचिवही सहभागी झाले.
आरे दुग्ध वसाहतीपासून मद्रासवाडीपर्यंत सुमारे तीन किलोमीटर अंतराची ही वॉकेथॉन अरबी समुद्राच्या साक्षीने पार पडली. विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जलसुरक्षेचा संदेश दिला.
‘माती वाचवा, पाणी जपा’चा संदेश
महा वॉकेथॉनदरम्यान ‘माती वाचवा, पाणी जपा’ हा संदेश देणारे संबोधन गीत सादर करण्यात आले. जलसंधारणाचे महत्त्व आणि महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नागरिकांची जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली.
उपक्रमाच्या शेवटी ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून सहभागीदारांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. जलसंधारण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे जलसंधारणाचा विषय व्यापक जनचळवळीच्या रूपात पुढे नेण्यास मदत झाली असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला नव्या पिढीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0