अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना संधी द्या – आयुक्त अश्विनी भिडे

मुंबई महानगर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरात पहाटे आकस्मिक पाहणी करत त्यांनी स्वच्छता मोहिमेला गती देण्यावर भर दिला.

Apr 29, 2026 - 20:24
 0  15
अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना संधी द्या – आयुक्त अश्विनी भिडे
मुंबई स्वच्छता, अश्विनी भिडे, बृहन्मुंबई महानगरपालिका

मुंबई, दि. २९ एप्रिल २०२६ : मुंबई महानगर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके ठेवण्यासाठी दैनंदिन कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्था अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच नागरिक संघटना, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची व्यवहार्यता तपासून त्यांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.

आयुक्त भिडे यांनी बुधवारी पहाटे वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता चौक्यांना आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी वडाळा परिसरातील सुका कचरा संकलन केंद्र तसेच बरकत अली दर्गा मार्ग आणि अरुणकुमार वैद्य मार्गावरील स्वच्छता कामांचीही त्यांनी पाहणी केली.

या मार्गांच्या दोन्ही बाजूंना उभी असलेली बेवारस वाहने हटवून परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कचरा व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा

पाहणीदरम्यान आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत कचरा संकलनाच्या फेऱ्या, वर्गीकरण, वाहतूक व्यवस्था आणि जास्त कचरा निर्माण होणारे भाग यांची माहिती घेतली. घराघरांतून संकलित होणाऱ्या कचऱ्याचे प्रभावी नियोजन करण्यास त्यांनी सांगितले.

दाटवस्ती भागात कचरा वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती करावी, तसेच ‘मुंबई क्लीन लीग’ अभियान अधिक परिणामकारकपणे राबवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

घनकचरा व्यवस्थापन नागरी सहभागातून अधिक प्रभावी होऊ शकते, असे सांगत त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम राबवण्याच्या सूचना केल्या. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दाटवस्तींमध्ये स्वच्छ मुंबई जनजागृती अभियान अधिक सक्षम करावे, असेही त्यांनी सांगितले.

वॉर्डनिहाय GIS मॅपिंगचा प्रस्ताव

दाटीवाटीच्या वस्ती आणि झोपडपट्टी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याने अशा भागांचे भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणालीद्वारे (GIS) मॅपिंग करावे. प्रत्येक रस्त्यावरील कचरा संकलनाचा आराखडा तयार करून त्याचा अभ्यास करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही बसवून निगराणी ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नागरिकांशी थेट संवाद

आयुक्त भिडे यांनी वडाळा, चुनाभट्टी आणि चेंबूर येथील नागरिकांशी संवाद साधत परिसर स्वच्छतेबाबत थेट अभिप्राय जाणून घेतला.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश

प्रमुख रस्त्यांवरील स्वच्छतेची दृश्यमानता वाढवावी, बसथांबे अधिक स्वच्छ ठेवावेत, राडारोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.