राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी एसओपी लागू होणार; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर भर

राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली. गोंदिया येथील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 1, 2026 - 19:16
 0  12
राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी एसओपी लागू होणार; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर भर
नर्सिंग महाविद्यालय, एसओपी, परिचर्या प्रशिक्षण विद्यालय

मुंबई | प्रतिनिधी देवानंद शिंदे 

राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील 45 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनेसंदर्भात सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिली.

मंत्री आबिटकर म्हणाले की, या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस सामान्य रुग्णालय, गोंदिया यांनी नियुक्त केलेल्या त्रिस्तरीय चौकशी समिती तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानुसार विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या अन्नामुळे विषबाधा झाल्याचे आढळून आलेले नाही.

गोंदिया येथील परिचर्या प्रशिक्षण विद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या अन्नाची तसेच पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी केली जात असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या व्यवस्थापनात एकसमानता आणण्यासाठी सर्व शासकीय नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

या निर्णयामुळे नर्सिंग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह वसतिगृह व्यवस्थापन, अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजनांमध्ये अधिक प्रभावी आणि एकसमान प्रणाली विकसित होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.