‘देश प्रथम’चा संदेश; मंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदेशी चलन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कुटुंबासोबतचा नियोजित लंडन-पॅरिस-ॲम्स्टरडॅम दौरा रद्द केला. देशहिताला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.
मुंबई : सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रधानमंत्री यांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल निश्चित करण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासमवेत पर्यटन आणि सुट्टीसाठी हा दौरा आखण्यात आला होता.
मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने मंत्री देसाई यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून ‘देश प्रथम’ या भूमिकेचे हे उदाहरण मानले जात आहे.
याबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी वैयक्तिक आनंद आणि सुट्टीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0