‘आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ९३व्या जन्मदिनानिमित्त ए. आर. रहमान यांनी तयार केलेल्या ‘आशा फॉरएव्हर’ गीताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत लोकार्पण करण्यात आले.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई, दि. ८ सप्टेंबर २०२६ : ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणजे सळसळते चैतन्य आणि ऊर्जा होत्या. वयाच्या नव्वदीतही सादरीकरण करताना त्यांच्यातील ऊर्जा, उत्साह आणि जीवनाविषयीचे प्रेम प्रकर्षाने जाणवत असे. त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
आशा भोसले यांच्या ९३व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी तयार केलेल्या ‘आशा फॉरएव्हर’ या गीताचे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, संगीतकार ए. आर. रहमान, आशा भोसले यांची नात जनाई भोसले, भोसले कुटुंबीय तसेच चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘आशा फॉरएव्हर’ ही सुंदर स्वरांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या सांगीतिक योगदानाचा गौरव करताना सांगितले की, आशाजींचे संपूर्ण आयुष्य आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरलेले होते. आपल्या स्वरांनी अनेक दशकांपासून रसिकांना आनंद देणाऱ्या आशाजींच्या आठवणी आणि त्यांचा समृद्ध सांगीतिक वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
याच भावनेतून तयार करण्यात आलेले ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत आशा भोसले यांना दिलेली सुंदर स्वरांजली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘आशाजींचा आवाज कधीही न संपणारी अनुभूती’
आशा भोसले यांच्या आवाजाचे वर्णन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशाजींचा आवाज ही कधीही न संपणारी अनुभूती आहे. जोपर्यंत त्यांची गाणी ऐकली जातील, तोपर्यंत त्या रसिकांच्या मनात कायम राहतील.
आशा भोसले यांच्या आठवणी जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन दरवर्षी व्हावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. ‘आशा फॉरएव्हर’ गीताच्या निर्मितीसाठी संगीतकार ए. आर. रहमान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि गीतनिर्मितीशी संबंधित संपूर्ण चमूचे त्यांनी अभिनंदन केले.
आशा भोसले यांचे भारतीय संगीताला मोठे योगदान
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही आशा भोसले यांच्या सांगीतिक योगदानाचा गौरव केला. आशा भोसले यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाशी तसेच देश-विदेशातील संगीतप्रेमींशी अतूट नाते होते, असे त्यांनी सांगितले.
आशा भोसले यांनी मराठीसह विविध भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये गाणी गायली. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून दिली, असे ॲड. शेलार यांनी नमूद केले.
ए. आर. रहमान यांचे आशाजींना अभिवादन
‘आशा फॉरएव्हर’ या गीताचे संगीतकार ए. आर. रहमान यांनी हे गीत आशा भोसले यांना विनम्र अभिवादन असल्याचे सांगितले.
आशाजी या केवळ महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या नव्हे, तर संपूर्ण जगाच्या कन्या आहेत, असे सांगताना त्यांच्या आवाजाचा आणि सांगीतिक वारशाचा ठसा सदैव कायम राहील, असे ए. आर. रहमान यांनी नमूद केले.
यावेळी जनाई भोसले यांनी ‘आशा फॉरएव्हर’ गीताच्या निर्मितीबाबत उपस्थितांना माहिती दिली.
‘आशा फॉरएव्हर’ गीताचे दृकश्राव्य सादरीकरण
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आशा फॉरएव्हर’ गीताचे कळ दाबून अधिकृत प्रकाशन (रिलीज) करण्यात आले. त्यानंतर या गीताचे दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले.
आशा भोसले यांच्या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीला आणि त्यांच्या अमूल्य वारशाला अभिवादन करणाऱ्या या उपक्रमातून त्यांच्या संगीताची जादू नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0