पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारी अधिक सक्षम करावी. नदीकाठच्या नागरिकांचे सर्वेक्षण, बचाव यंत्रणा, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनी दिले.

Aug 1, 2026 - 01:06
 0  3
पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल
गडचिरोली पूरस्थिती, अतिवृष्टी, डॉ. आशिष जयस्वाल, गडचिरोली जिल्हा प्रशासन,

विदर्भ: प्रतिनिधी | 

गडचिरोली, दि. ३१ : बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी अधिक सक्षम करावी. पूरप्रवण व नदीकाठच्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांची सुरक्षितता हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, बचाव कार्यात कोणतीही दिरंगाई होता कामा नये, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. एस. रामा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजीव पारी यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनी पूरप्रवण भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत नागरिकांना वेळेवर सतर्क करणे, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आणि बचाव कार्यात कोणतीही दिरंगाई होऊ न देण्याच्या सूचना दिल्या.

नदीकाठच्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना

नदीकाठच्या तसेच पूरप्रवण भागातील नागरिकांचे ‘डोअर-टू-डोअर’ सर्वेक्षण करून त्यांची अद्ययावत माहिती तयार करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. वारंवार पूराचा धोका असलेल्या कुटुंबांची स्वतंत्र मास्टर लिस्ट तयार करून त्यांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पूरस्थितीत बचाव कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरखंड तसेच इतर आवश्यक बचाव साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.

बदलत्या हवामानानुसार नियोजनात सुधारणा

बदलत्या हवामानामुळे कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक नियोजनात आवश्यक बदल करून नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री डॉ. जयस्वाल यांनी नमूद केले.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य व वेळेवर सूचना देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभावी जनजागृती करावी. तसेच बचाव व मदत कार्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सतत सज्ज ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पूल व नदीपात्रांजवळ सूचना फलक लावणार

पूराच्या पाण्यामुळे रस्ते व पूल पाण्याखाली गेल्यानंतर काही नागरिक जीव धोक्यात घालून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करतात. अशा घटना टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी बॅरिकेड्स उभारावेत, धोकादायक भागात सूचना फलक लावावेत तसेच स्थानिक प्रशासनाने नागरिकांना वेळोवेळी सतर्क करावे, असे निर्देश देण्यात आले.

पूरस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक पावले उचलावीत. पूरप्रवण गावांमध्ये स्थानिक पातळीवर बचाव पथके तयार करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण व साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.

आरोग्य सेवेसाठी विशेष यंत्रणा

पूरग्रस्त भागात नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी. दुर्गम भागातील गंभीर व आपत्कालीन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आरोग्य विभागाच्या तयारीबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील दुर्गम व पूरप्रवण भागांमध्ये आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पूरस्थितीचा जिल्हास्तरीय आढावा

बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा सादर केला. भामरागड तालुक्यातील परिस्थिती, नदीपात्रातील पाण्याची पातळी तसेच पूरप्रवण गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

मुसळधार पावसामुळे काही दुर्गम भागातील वाहतूक व दळणवळणावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी मार्ग, बचाव केंद्रे आणि आपत्कालीन मदत व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत पूरपूर्व तयारी, बचाव कार्य, आरोग्य सेवा, बोट व इतर आवश्यक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि जनजागृती या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनी दिले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.