वेशांतर करून हरिष भांदिर्गे यांची KEM रुग्णालयात मध्यरात्री धाड; आपत्कालीन विभागातील अनागोंदी उघड

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी वेशांतर करून मध्यरात्री KEM रुग्णालयाची अचानक पाहणी केली. यावेळी आपत्कालीन विभागातील उपचारांतील विलंब, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रुग्ण व लोकप्रतिनिधींशी होत असलेल्या कथित गैरवर्तनाच्या तक्रारी समोर आल्या. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Jul 17, 2026 - 14:55
 0  67
वेशांतर करून हरिष भांदिर्गे यांची KEM रुग्णालयात मध्यरात्री धाड; आपत्कालीन विभागातील अनागोंदी उघड
हरिष भांदिर्गे, KEM रुग्णालय, मुंबई महानगरपालिका, आरोग्य समिती

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

मुंबई, दि. १६ : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी वेशांतर करून मध्यरात्री KEM रुग्णालयाला अचानक भेट दिली. या पाहणीत आपत्कालीन विभागातील उपचारांमध्ये होत असलेला कथित विलंब, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रुग्ण तसेच लोकप्रतिनिधींशी संवादातील त्रुटी समोर आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

प्रसिद्धीपत्रकानुसार, उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या एका रुग्णाला सकाळी ११ वाजता KEM रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, सुमारे साडेनऊ ते दहा तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री १०.३० वाजता त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपत्कालीन रुग्णासाठी झालेला हा विलंब गंभीर असल्याचे भांदिर्गे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, रुग्णालयातून "कोणत्याही लोकप्रतिनिधीचे फोन स्वीकारू नयेत" अशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारानंतर त्यांनी रात्री १२ वाजता प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान कॅज्युअल्टी विभागात प्राथमिक तपासणीसाठी रुग्णांना दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे तसेच ड्युटीवरील काही डॉक्टर आणि ऑन-कॉल सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (AMO) वेळेवर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही कर्मचारी लोकप्रतिनिधींचे किंवा वैयक्तिक मोबाईलवरील फोन स्वीकारत नसल्याची बाबही समोर आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

यानंतर रात्री १.३० वाजता KEM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उपलब्ध डॉक्टरांवर ताण असल्याचे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना हरिष भांदिर्गे यांनी रुग्णसंख्या वाढणे हे वास्तव असले तरी त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी कमी होत नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत अधिक प्रभावी नियोजन, पुरेसे मनुष्यबळ आणि सक्षम व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भांदिर्गे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच आपत्कालीन विभागाच्या कार्यपद्धतीचे पुनर्मूल्यांकन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रुग्ण मार्गदर्शन आणि संवाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत.

महानगरपालिकेची रुग्णालये ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आरोग्यसेवा व्यवस्था असून प्रत्येक रुग्णाला वेळेत, सन्मानपूर्वक आणि दर्जेदार उपचार मिळणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.