जपातलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना गंभीर; दोषींची गय नाही – आदिवासी विकास ,सर्पदंशग्रस्त दीपिकाच्या पुढील उपचारासाठी नायपूरला एअरलिफ्ट; जिल्हा प्रशासनाची तत्परता मंत्री डॉ. अशोक उईके

धानोरा तालुक्यातील जपातलाई अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्याची घटना गंभीर असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

Aug 10, 2026 - 22:13
 0  9
जपातलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना गंभीर; दोषींची गय नाही – आदिवासी विकास ,सर्पदंशग्रस्त दीपिकाच्या पुढील उपचारासाठी नायपूरला एअरलिफ्ट; जिल्हा प्रशासनाची तत्परता मंत्री डॉ. अशोक उईके
जपातलाई आश्रमशाळा, सर्पदंश घटना, गडचिरोली

प्रतिनिधी : राजेंद्र कीलनाके 

जपातलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना अत्यंत गंभीर; दोषींची गय नाही – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही; चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई

गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपातलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले.

जपातलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत मंत्री डॉ. उईके यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आश्रमशाळा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अथवा निष्काळजीपणा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“अनुदानित आश्रमशाळेत अशा प्रकारची घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून एखादी संस्था आश्रमशाळा चालवत असेल, तर अशा निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली जाईल. या घटनेत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. कोणालाही सोडले जाणार नाही,” असे मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले.

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच त्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे ही संबंधित संस्था आणि व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा दुर्लक्ष होता कामा नये, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आश्रमशाळांमध्ये निवासी परिसराची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची नियमित देखरेख तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आले आहेत. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणा आणि आश्रमशाळा व्यवस्थापनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मंत्री डॉ. उईके यांनी दिल्या आहेत.

धानोरा तालुक्यातील जपातलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या ११ वर्षीय कुमारी दीपिका विलासराव मडावी हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ एअरलिफ्ट करून नागपूर येथे हलविले आहे. दीपिकाला हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दीपिकावर उपचार सुरू असताना तिच्या प्रकृतीचा विचार करून अधिक प्रभावी आणि आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तिला नागपूर येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि दीपिकाला नागपूर येथे पुढील उपचारासाठी पोहोचविण्यात आले.

दीपिकाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली पुढील वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील संबंधित वैद्यकीय यंत्रणेशी समन्वय साधला आहे. तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

जपातलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाची घटना घडल्यानंतर प्रशासनाने तातडीने वैद्यकीय उपचाराची कार्यवाही केली. विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार मिळावेत आणि गंभीर परिस्थितीमध्ये वेळ न दवडता उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता याव्यात, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक समन्वय साधण्यात आला.

दीपिकाला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याच्या निर्णयामुळे गंभीर रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तत्परता दिसून आली आहे. तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.