जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘एसओपी’; १४ ऑगस्टला आढावा बैठक

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश दुर्घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन नवीन प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली.

Aug 11, 2026 - 01:12
 0  8
जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘एसओपी’; १४ ऑगस्टला आढावा बैठक
जपतलाई आश्रमशाळा, गडचिरोली सर्पदंश, आश्रमशाळा विद्यार्थी सुरक्षा, ॲड. आशिष जयस्वाल, नवीन एसओपी, आदिवासी

प्रतिनिधी : राजेंद्र किलनाके 

गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील. तसेच आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती अर्थात ‘एसओपी’ निश्चित करण्यात येईल, अशी माहिती सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली.

जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्रीच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोपिका इतवा लकडा (इयत्ता ६ वी), सुकुमिता सरोजीत मंडल (इयत्ता ८ वी) आणि अनु गायकवाड कोरेटी (इयत्ता २ री) या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

सर्पदंश झालेल्या इतर विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर प्रकृती असलेल्या दिपिका मडावी या विद्यार्थिनीला प्रशासनाने एअर अॅम्ब्युलन्सच्या सुविधेद्वारे पुढील उपचारासाठी हलवून आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.

सहपालकमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी धानोरा येथील शवागृहात जाऊन मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते.

घटनेनंतर विविध बाबींचा आढावा घेताना काही ठिकाणी अधिक जागरूकता आणि जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. झालेल्या त्रुटींचा आढावा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येक स्तरावर आवश्यक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

१४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

आश्रमशाळांच्या व्यवस्थापनासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच शासन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत विद्यार्थी सुरक्षा, आश्रमशाळांचे व्यवस्थापन, विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर आश्रमशाळांसाठी नवीन ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर’ (SOP) निश्चित करण्यात येणार असल्याचे ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

सर्पदंश दुर्घटनेत मृत झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येकी १ लाख रुपयांची तातडीची मदत कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली असून, उर्वरित मदतीची प्रक्रिया सुरू आहे.

याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक कुटुंबाला अतिरिक्त ५ लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच इतर शासकीय योजनांच्या माध्यमातूनही संबंधित कुटुंबीयांना शक्य ते सर्व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

या दुर्घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि व्यवस्थापनाची जबाबदारी यांना अधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.