सामान्य जनतेपर्यंत प्रशासन पोहोचावे; बामणीतील महसूल समाधान शिबिरात १७,५०७ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप

कागल तालुक्यातील बामणी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात १७ हजार ५०७ लाभार्थ्यांना विविध वैयक्तिक लाभांच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Aug 1, 2026 - 00:50
 0  13
सामान्य जनतेपर्यंत प्रशासन पोहोचावे; बामणीतील महसूल समाधान शिबिरात १७,५०७ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप
हसन मुश्रीफ, महसूल समाधान शिबिर, बामणी, कागल, कोल्हापूर,

कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. ३१ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राज्यातील सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, हीच सरकारची अपेक्षा असते. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’सारख्या अभियानांमधून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत असून, प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल तालुक्यातील बामणी येथील आर. के. हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात विविध शासकीय योजनांअंतर्गत सुमारे १७ हजार ५०७ लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभांच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अमरीशसिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे आणि गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे उपस्थित होते.

केशरी शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या सूचना

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, काही केशरी शिधापत्रिकाधारकांना अद्यापही मोफत तांदूळ आणि गहू मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पात्र नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी.

तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेपासून काही माता-भगिनी वंचित राहिल्या असल्याची बाब मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेली प्रधानमंत्री सूर्यघर योजना नागरिकांचे वीजबिल शून्यावर आणण्यास उपयुक्त ठरणार आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

एकाच छताखाली शासकीय सेवांचा लाभ

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, नागरिकांना शासनाच्या विविध सेवा एकाच छताखाली आणि अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला आहे.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत असून, त्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करणे शक्य होत आहे. नागरिकांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राठोड यांनी केले.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आणि वीजबिल माफी करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे सांगितले. गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अमरीशसिंह घाटगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा सविता माने, कागल पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, शिवानी भोसले, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, धनश्रीदेवी घाटगे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, अनिलकुमार हेगडे, दिगंबर अस्वले, रूपाली आंगज, तेजस्विनी भोरे, मनिषा पाटील, बाबासाहेब सांगले, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, नेताजी मोरे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.