केशवराव भोसले नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती; उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पाहणी
कोल्हापुरातील आगीत नुकसान झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाट्यगृहाची पाहणी केली.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर | दि. ७ ऑगस्ट २०२६
कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि कलाविश्वाची ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती पूर्ण झाली असून, रविवारी ९ ऑगस्ट रोजी या नाट्यगृहाचा पुन्हा पडदा उघडणार आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाट्यगृहाला भेट देऊन पुनर्निर्माणाच्या कामाची पाहणी केली.
ऑगस्ट २०२४ मध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला दुर्दैवी आग लागली होती. या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. कोल्हापूरच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी ही अत्यंत वेदनादायी घटना ठरली होती. या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
त्यावेळी नाट्यगृहाचे पूर्वीचे वैभव पुन्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता नाट्यगृहाची पूर्वीपेक्षाही अधिक दिमाखदार स्वरूपात पुनर्निर्मिती करण्यात आली आहे.
रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन रविवार, ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी
नाट्यगृहाला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. नाट्यगृहातील विविध सुविधा आणि पुनर्निर्माणाच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर आणि आदिल फरास उपस्थित होते.
“पूर्वीपेक्षाही अधिक दिमाखदार स्वरूपात नाट्यगृह उभारले”
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीपेक्षाही अधिक दिमाखदार स्वरूपात उभारण्यात आले आहे. रंगकर्मींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिका आणि शासनाने संयुक्तपणे केला आहे.”
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाट्यगृहाचा पुन्हा पडदा उघडला जाईल आणि हे नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच रंगकर्मी आणि कलारसिकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरच्या विकासकामांचेही लोकार्पण
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनानंतर प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
यामुळे नाट्यगृहाच्या पुनर्निर्मितीसोबतच शहरातील विविध विकासकामांना गती देण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
कागलमध्येही विविध कार्यक्रम
याच दिवशी कागल येथे हिंदूराव घाडगे विद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या जीर्णोद्धार कामांचे उद्घाटन होणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.
त्यामुळे ९ ऑगस्ट हा दिवस कोल्हापूर आणि कागल परिसरातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.
आगीत उद्ध्वस्त झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे नव्या रूपात पुनरुज्जीवन झाल्याने कोल्हापूरच्या रंगभूमी आणि कला क्षेत्राला पुन्हा एकदा मोठी चालना मिळणार असून, कलाकार आणि रसिकांमध्ये उद्घाटनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0