कोल्हापूरात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक; ग्रामीण आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच झालेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला. आयुष्मान आरोग्य केंद्रे, 108 रुग्णवाहिका सेवा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, साथीच्या आजारांवरील उपाययोजना आणि रिक्त पदे भरण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
प्रतिनिधी | कोल्हापूर उमेश जाधव
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित या बैठकीत ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविक करत महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वय वाढवून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या अधिक वेगाने सोडविणे हा समितीचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, ग्रामीण रुग्णालयांचे अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आयुष्मान आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा, 108 रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आपला दवाखाना योजना आणि इतर सार्वजनिक आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा झाली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस आणि अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, "प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहता कामा नये. यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे."
त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, असे सांगितले. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या, मनुष्यबळाची कमतरता, पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्याबाबत सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून पुढील तिमाही बैठकीत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ही बैठक ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
बैठकीच्या शेवटी आजरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0