कोल्हापूर मंडळातील १,३६० नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर मंडळातील बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत १,३६० खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर | दि. ८ जुलै २०२६
राज्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे.
कोल्हापूर मंडळात एकूण १,३६० खासगी रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामध्ये कोल्हापूर – ६७०, सांगली – ४५८, रत्नागिरी – १४६ आणि सिंधुदुर्ग – ८६ रुग्णालयांचा समावेश आहे.
या मोहिमेसाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर विशेष तपासणी पथके गठित करून प्रत्येक रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देत कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सखोल पडताळणी केली जाणार आहे.
या बाबींची होणार तपासणी
रुग्णालयात रुग्णशुल्क व इतर सेवा शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का?
रुग्ण हक्क संहिता ठळकपणे प्रदर्शित करण्यात आली आहे का?
अग्निसुरक्षा (फायर ऑडिट) पूर्ण करण्यात आले आहे का?
आवश्यक परवाने, तांत्रिक सुविधा आणि कायदेशीर निकषांचे पालन केले जात आहे का?
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का?
तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, आवश्यक सुविधांचा अभाव, खोटी माहिती, बेकायदेशीर कामकाज किंवा रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थांविरुद्ध बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अधिनियमातील तरतुदीनुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम कोणत्याही रुग्णालयाला त्रास देण्यासाठी नसून नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमबद्ध आरोग्यसेवा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व खासगी रुग्णालयांनी नियमांचे काटेकोर पालन करून तपासणी प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0