जलसंधारणाच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे; २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’ – मंत्री संजय राठोड

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन. जलसंधारणाच्या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

Aug 20, 2026 - 16:21
Aug 22, 2026 - 18:29
 0  7
जलसंधारणाच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे; २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’ – मंत्री संजय राठोड
महा वॉकेथॉन २०२६, Walk for Water, संजय राठोड, जलसंधारण अभियान

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या जलसंधारण लोकचळवळीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश राज्यभर पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयात वॉकेथॉन

‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’चा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईतील वरळी प्रोमेनेड येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणीही एकाच दिवशी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी, कलाकार, खेळाडू, अधिकारी-कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

‘चार हजार पावले पाण्यासाठी’

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ३ किलोमीटर अंतर चालायचे आहे. साधारणपणे ३ किलोमीटर अंतर म्हणजे जवळपास चार हजार पावलांचा प्रवास होतो. त्यामुळे ‘४ हजार पावले पाण्यासाठी’ हा संदेश या अभियानाचा केंद्रबिंदू राहणार आहे.

हा उपक्रम केवळ तीन किलोमीटर चालण्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी जनजागृती करणारी चळवळ असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संधारण करण्याचा संदेश

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संधारण करणे, पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे, भूजल पातळी वाढविणे, मातीची धूप रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हा महा वॉकेथॉनचा प्रमुख उद्देश आहे.

जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

याशिवाय जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम दहा विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर ७१ हजार रुपयांची बक्षिसे

प्रत्येक जिल्ह्यात प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण ७१ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

यामध्ये—

प्रथम पुरस्कार : २५ हजार रुपये आणि गौरवचिन्ह

द्वितीय पुरस्कार : १५ हजार रुपये आणि गौरवचिन्ह

तृतीय पुरस्कार : १० हजार रुपये आणि गौरवचिन्ह

विशेष पुरस्कार : प्रत्यक्ष सहभागींपैकी ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी ३ हजार रुपये

अशा स्वरूपाची बक्षिसे प्रस्तावित आहेत.

सोशल मीडियावरही जलसंधारणाचा संदेश

जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. महा वॉकेथॉनशी संबंधित सोशल मीडिया पोस्टसाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह

महा वॉकेथॉन हा राज्यात राबविण्यात येत असलेल्या व्यापक जलसंधारण अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

या सप्ताहादरम्यान जलसंधारण, पाणी बचत आणि जलस्रोत संवर्धनाबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

२६ जानेवारी २०२७ पर्यंत जलसंधारण अभियान

याशिवाय १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात व्यापक जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, मृदसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

महाराष्ट्राचे भवितव्य जलसुरक्षित करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचा सहभाग आणि लोकचळवळीची जोड मिळणे आवश्यक आहे. ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवून पाणी बचतीसाठी सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.