नेपाळ-तिबेटमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न; 37 भाविक काठमांडूकडे रवाना
नेपाळमधील काठमांडू आणि तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी राज्य व केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सागा येथे अडकलेले 37 भाविक काठमांडूकडे रवाना झाले असून नागपूरमधील 106 नागरिकही सुरक्षित परतीच्या मार्गावर आहेत.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई, दि. 28 : नेपाळमधील काठमांडू तसेच तिबेटमधील सागा येथे पर्यटन आणि कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी राज्य प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार, नेपाळ आणि चीन सरकारच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
दरम्यान, रायगड, अहिल्यानगर आणि नागपूर जिल्ह्यांतील नागरिक सुरक्षित असून, त्यापैकी अनेक जण पर्यायी मार्गाने भारतात परतण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
अहिल्यानगरमधील 45 जणांचा ग्रुप सुखरूप
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सचे टूर ऑपरेटर दर्शन गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये गेलेल्या 45 जणांच्या ग्रुपमध्ये अहिल्यानगरचे 27, नाशिकचे 12, पुण्याचे 5 आणि मुंबईतील एका नागरिकाचा समावेश आहे.
हा ग्रुप सध्या नेपाळमधील चितवन येथे सुरक्षित आहे. काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने हा ग्रुप लुंबिनीमार्गे पुढे जाणार आहे. लुंबिनी येथे मुक्काम केल्यानंतर 29 ऑगस्ट रोजी अयोध्येकडे रवाना होण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
निर्मलाताई गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप नेपाळमध्ये आहे. सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
रायगडमधील 37 भाविक सागाहून काठमांडूकडे रवाना
रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने 37 व्यक्ती नेपाळमध्ये दर्शन आणि पर्यटनासाठी गेल्या होत्या. सध्या हे सर्वजण तिबेटमधील सागा येथे सुरक्षित आहेत.
त्यांचे काठमांडूहून भारतात परतण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी विमानाचे आरक्षण आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने हे सर्वजण आज सकाळी काठमांडूकडे रवाना झाले असून, सायंकाळपर्यंत काठमांडू विमानतळावर पोहोचण्याचे नियोजन आहे.
सर्वांची प्रकृती ठीक असून या 37 जणांपैकी दोन जण डॉक्टर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर 37 भाविकांचा मार्ग मोकळा
दरम्यान, कैलास-मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक आज सकाळी 6 वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात सागा येथे अडकल्याने त्यांच्या काठमांडूला परतण्याचा मार्ग अडचणीत आला होता. त्यांचे काठमांडूहून भारतात परतण्याचे विमान 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नियोजित आहे.
भाविक अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आवश्यक सहकार्य मिळाल्याने सागा ते काठमांडू असा सुरक्षित प्रवास सुरू झाला.
संकटाच्या काळात तातडीने मदत मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
नागपूरचे 106 नागरिक सुरक्षित
नागपूर जिल्ह्यातील सर्व 106 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक समन्वय आणि देखरेख केली जात आहे.
यापैकी 4 नागरिक विमानाने दिल्ली येथे सुखरूप पोहोचले आहेत, तर उर्वरित 102 नागरिक बसमार्गे भारतात दाखल झाले आहेत. सध्या हे 102 नागरिक बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात असून, आज रात्री ते पाटणा येथे पोहोचून मुक्काम करणार आहेत.
त्यानंतर 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजताच्या रेल्वेने पाटणा येथून नागपूरकडे रवाना होण्याचे नियोजन आहे.
नाशिकमधील 11 नागरिकांसाठी मदतीचे प्रयत्न
नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील 11 नागरिक काठमांडू येथे असून त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती नेपाळमध्ये अडकली असल्याची माहिती अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेली नाही.
अडकलेल्या नागरिकांनी माहिती नोंदवावी
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्यातर्फे ऑनलाइन माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी आपली किंवा आपल्या नातेवाईकांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत माहिती नोंदणी लिंकचा वापर करावा.
हेल्पलाइन क्रमांक : 1070
मंत्रालयातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावे आणि अडकलेल्या नागरिकांची अचूक माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0