चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन – मंत्री आशिष शेलार
महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर सरकारचा भर असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई, दि. ११ : राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तीन तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.
ही समिती देशातील विविध राज्ये तसेच परदेशातील चित्रपट उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.
चित्रपट निर्मात्यांसोबत बैठक
सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबईतील चित्रीकरणादरम्यान येणाऱ्या अडचणी, आवश्यक सुविधा, परवानग्या आणि उद्योगवृद्धीसाठी आवश्यक धोरणात्मक बदलांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस स्वाती म्हसे पाटील, प्रशांत साजणीकर, शिबासिश सरकार, मधू भोजवानी, अपूर्व मेहता, आशिष सिंह यांच्यासह अनेक निर्माते आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन फिल्म सिटी आणि शूटिंग डेस्टिनेशन्स
मंत्री शेलार म्हणाले की, राज्यात नवीन चित्रीकरण केंद्रे विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. कोल्हापूर येथे रेल्वे स्टेशनसह दोन ते तीन नवीन शूटिंग डेस्टिनेशन्स विकसित करण्यात येत आहेत.
तसेच नागपूर येथील रामटेक आणि नाशिक येथे जमीन संपादन पूर्ण झाले असून तेथे नवीन चित्रनगरी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
एन.डी. स्टुडिओचे आधुनिकीकरण
एन. डी. स्टुडिओ चे आधुनिकीकरण शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती देत मंत्री शेलार यांनी सांगितले की, पूर्वीच्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता खासगी सहभागासह ‘हायब्रिड मॉडेल’ विकसित करण्यात येत आहे.
‘सिंगल विंडो क्लिअरन्स’वर भर
चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या सुलभ करण्यासाठी ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ प्रणाली विकसित करण्यात आली असून सर्व परवानग्या ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय एफटीआयआय चे अल्पकालीन अभ्यासक्रम फिल्म सिटीमध्ये सुरू करण्यात आले आहेत. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचा कॅम्पसही एनएफडीसी कार्यालयात सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मालाडमधील १०० एकर जागेचा विकास
मुंबईतील मालाड पश्चिम येथे केंद्र शासनाकडून मिळालेल्या १०० एकरांहून अधिक जागेचा विकास करून ती कोस्टल रोड आणि सी-लिंकशी जोडण्याचे नियोजन असल्याचेही मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0