गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!’; म्हाडाच्या डिजिटल गणेशोत्सव स्पर्धेचा शुभारंभ

म्हाडा डिजिटल गणेशोत्सव २०२६ स्पर्धेचा ‘डिजीम्हाडा’ ॲपवर शुभारंभ. म्हाडा रहिवासी व गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन सहभागाची संधी; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला विशेष महत्त्व.

Sep 8, 2026 - 21:58
 0  9
गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!’; म्हाडाच्या डिजिटल गणेशोत्सव स्पर्धेचा शुभारंभ
म्हाडा डिजिटल गणेशोत्सव २०२६, MHADA Digital Ganeshotsav 2026, डिजीम्हाडा ॲप, म्हाडा गणेशोत्सव स्पर्धा,

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

‘डिजीम्हाडा’ ॲपवरून ऑनलाइन सहभागाची संधी; पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेला मिळणार व्यासपीठ

मुंबई, दि. ७ सप्टेंबर २०२६ : म्हाडाच्या विविध वसाहती आणि अभिन्यासांमध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांच्या उत्साहाला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेला, सामाजिक बांधिलकीला आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘म्हाडा डिजिटल गणेशोत्सव २०२६ – गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!’ या अभिनव स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ‘डिजीम्हाडा’ ॲपवर या स्पर्धेचे गो-लाईव्ह उद्घाटन करण्यात आले.

म्हाडा परिवाराच्या गणेशोत्सवाला डिजिटल व्यासपीठ

म्हाडाच्या राज्यभरातील विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील अभिन्यास तसेच म्हाडा वसाहतींमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्तरावर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या उत्सवातील विविध संकल्पना, आकर्षक सजावट, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणपूरक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘डिजीम्हाडा’ ॲपच्या माध्यमातून म्हाडा परिवाराच्या गणेशोत्सवाच्या उत्सवी परंपरेला डिजिटल व्यासपीठ मिळणार आहे.

गणेशोत्सव मंडळांसह म्हाडा रहिवाशांना सहभागाची संधी

म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळे तसेच वैयक्तिक पातळीवर गणेशोत्सव साजरा करणारे म्हाडा रहिवासी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘डिजीम्हाडा’ ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करताना स्पर्धकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित म्हाडा वसाहत किंवा अभिन्यासाचे नाव आणि गणेशोत्सवाचा प्रकार यासंबंधीची माहिती भरावी लागणार आहे.

त्यानंतर गणेशमूर्ती, सजावट आणि गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये दर्शविणारी छायाचित्रे तसेच कमाल दोन मिनिटांचा व्हिडिओ ॲपवर अपलोड करता येणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्वतंत्र विभाग

या स्पर्धेचे आयोजन म्हाडाच्या राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार जिल्हानिहाय करण्यात येणार आहे.

मुंबई विभागाचे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील म्हाडा रहिवाशांना आपल्या गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना, सजावट आणि सामाजिक उपक्रम महाराष्ट्रासमोर डिजिटल माध्यमातून मांडण्याची संधी मिळणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला विशेष महत्त्व

या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. परीक्षणाच्या वेळी नैसर्गिक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पर्यावरणपूरक सजावट, जलसंवर्धन, निर्माल्य व्यवस्थापन आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यांचा विचार केला जाणार आहे.

याशिवाय सामाजिक आणि जनजागृतीपर संदेश देणाऱ्या सजावटींनाही महत्त्व दिले जाणार आहे.

‘हरित गणेशोत्सव – स्वच्छ गणेशोत्सव’चा संदेश

‘हरित गणेशोत्सव – स्वच्छ गणेशोत्सव’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत पर्यावरणाचे संवर्धन आणि सामाजिक जाणीव जपत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण सर्जनशीलता, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणपूरकता, सजावट आणि उत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण अशा विविध निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे.

सर्वाधिक मतांच्या आधारे विजेत्यांची निवड

स्पर्धेतील विजेत्यांची निवड सर्वाधिक मिळालेल्या मतांच्या आधारे केली जाणार आहे. तसेच विविध विभागांमधून उत्कृष्ट गणेशोत्सवांची निवड करून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे.

यामुळे म्हाडाच्या विविध वसाहतींमधील गणेशोत्सव मंडळे आणि रहिवाशांना आपल्या कल्पकतेचे आणि सामाजिक उपक्रमांचे डिजिटल माध्यमातून सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

म्हाडाच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

त्याचबरोबर म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना डिजिटल माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

म्हाडा रहिवासी आणि गणेशोत्सव मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन

‘डिजीम्हाडा’च्या माध्यमातून म्हाडा परिवाराला जोडणाऱ्या या अभिनव उपक्रमात राज्यभरातील म्हाडा रहिवासी, गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच आपल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर डिजिटल माध्यमातून सादर करावीत, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.