भारतीय चलनाच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून विक्री करणारा अटक; १० लाख ६४ हजारांच्या २१२८ बनावट नोटा जप्त
मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळ बनावट भारतीय चलनी नोटांची विक्री करणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा कक्ष-२ कडून अटक. कारवाईत २१२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची दर्शनी किंमत १० लाख ६४ हजार रुपये आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे:
गुन्हे शाखा कक्ष-२ची कारवाई; २१२८ बनावट नोटा जप्त
मुंबई : भारतीय चलनाच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाला मुंबई गुन्हे शाखा कक्ष-२च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत एकूण २१२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची दर्शनी किंमत १० लाख ६४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्हे शाखा कक्ष-२ येथे दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मेट्रो सिनेमा जवळ, वासुदेव बळवंत फडके चौक, मुंबई येथे एक महिला आणि एक इसम भारतीय चलनाच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून आर्थिक फायद्यासाठी त्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सापळा रचून कारवाई
मिळालेल्या माहितीच्या आधारे कक्ष-२ कार्यालयाच्या पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी एका महिलेकडून ५०० रुपये दराच्या २७० बनावट नोटांसह तिला ताब्यात घेण्यात आले. या महिलेने सदर बनावट नोटा एका इसमाकडून आणल्याचे सांगितले.
त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित इसमाचा शोध घेण्यात आला. तो कुर्ला स्टेशनजवळ मिळून आला. त्याच्या ताब्यात ५०० रुपये दराच्या १८५८ बनावट नोटा आढळून आल्या.
अशाप्रकारे संबंधितांकडून एकूण ५०० रुपये दराच्या २१२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांची एकूण दर्शनी किंमत १० लाख ६४ हजार रुपये आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १७८, १८०, ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा, कक्ष-२ मार्फत सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन आणि सहायक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण श्री. दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-२ येथील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दिलीप तेजनकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. संकल्प मोकळ तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बनावट चलनी नोटांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधातील तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली असून, या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0