पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टीचा कहर; महापालिकेच्या अग्निशमन विभागाने १,५०० नागरिकांची सुटका, ५ हजारांचे सुरक्षित स्थलांतर
पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने युद्धपातळीवर बचावकार्य करत सुमारे १,५०० नागरिकांची बोटींच्या सहाय्याने सुटका केली. ५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले असून ७५० जनावरेही वाचविण्यात आली.
पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवत सुमारे १,५०० नागरिकांची बोटींच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली आहे. तसेच ५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून ७५० जनावरेही पुरातून वाचविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.
अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, भोसरीतील कुंदननगर यांसह शहरातील सुमारे २० ते २५ भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बोटींच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये अडकलेल्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे यशस्वी बचावकार्य करण्यात आले. तसेच नदीकाठच्या मंदिरांमध्ये अडकलेल्या पुजाऱ्यांना, ताथवडे परिसरातील वयोवृद्ध नागरिकांना, काळेवाडीतील गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जुनी सांगवी येथे पुरात अडकलेल्या आई आणि तिच्या बाळाची धाडसीपणे सुखरूप सुटका करण्यात आली.
पूरग्रस्त सुमारे ५,००० नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, तेथे भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे ७५० गाई, म्हशी आणि इतर जनावरांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या संपूर्ण बचाव मोहिमेत महापालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांतील अधिकारी, जवान आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी समन्वय, तत्परता आणि धाडसाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. उप अग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह अनेक अग्निशमन जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
नियंत्रण कक्षात २४ तास कार्यरत राहून आपत्कालीन कॉल स्वीकारणे, माहितीचे समन्वयन करणे आणि बचाव पथकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची जबाबदारी पूजा वलगुडे, करूणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी यशस्वीपणे पार पाडली.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0