पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे उद्दिष्ट कौतुकास्पद – राहुल नार्वेकर
पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत व नियोजनबद्ध विकासासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडलेल्या ५० वर्षांच्या विकास आराखड्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कौतुक केले. मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयुक्तांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील गरजा, वाढते शहरीकरण आणि उपलब्ध नागरी सुविधांचा सर्वांगीण विचार करून शहराच्या सूक्ष्म, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निश्चित केलेले उद्दिष्ट कौतुकास्पद आहे. या दिशेने ते निश्चितपणे यशस्वी वाटचाल करतील आणि पिंपरी चिंचवडला विकासाची नवी उंची प्राप्त करून देतील, असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, लोकमतचे संपादक संजय आवटे, दैनिक पुढारीचे संपादक सुनील माळी, लेट्स अप मराठीचे संपादक योगेश कुटे, सकाळ माध्यम समूहाच्या सहसंपादिका मृणालिनी नानिवडेकर यांच्यासह विविध माध्यम समूहांचे पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडच्या विकासाची आशियासाठी आदर्श वाटचाल
राहुल नार्वेकर यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितले की, अनेक वर्षांनंतर पिंपरी चिंचवड शहरात येण्याची संधी मिळाली. पूर्वी गावाच्या स्वरूपात असलेल्या या परिसराने गेल्या काही दशकांत अत्यंत प्रभावशाली आणि विकसित शहर म्हणून घेतलेली झेप ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण आशियासाठी एक उत्तम उदाहरण आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशियातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक असून, वेगाने होणारे शहरीकरण अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वत पद्धतीने कसे करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण शहरातून पाहायला मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
शहराचा विकास केवळ रस्ते, पूल किंवा अन्य पायाभूत सुविधा उभारण्यापुरता मर्यादित नसतो. वाढत्या शहरीकरणासोबत नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, प्रशासन अधिक सक्षम करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना प्रभावी प्रतिसाद देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या दृष्टीने पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेले काम महत्त्वपूर्ण असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हे प्रमुख उद्दिष्ट
सन्मान स्वीकारताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, “पिंपरी चिंचवड शहराने मला आपल्यात सामावून घेतले आहे. या शहराचा नावलौकिक अधिक उंचावत असताना त्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हे माझ्यासमोरील प्रमुख उद्दिष्ट आहे.”
मिळालेल्या सन्मानामुळे आपल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून, शहराच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये सकारात्मक संवाद आवश्यक
शहरातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनासमोरील प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करीत असतात. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासोबतच प्रशासनाच्या कामकाजाकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे आणि आवश्यक तेथे प्रश्न उपस्थित करणे ही प्रसारमाध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे.
पत्रकारांनी केलेली टीका तसेच त्यांनी प्रशासनासमोर मांडलेल्या समस्या शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यातून महापालिका प्रशासनाला आपल्या कामातील त्रुटी समजतात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते, असे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
“पत्रकारांनी प्रशासनाला नेहमी आरसा दाखवायला हवा आणि त्या आरशात दिसणारा चेहरा सुधारण्याचे काम प्रशासनाने केले पाहिजे,” असे सांगत त्यांनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील सकारात्मक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
पत्रकारांनी मांडलेल्या प्रश्नांकडे केवळ टीका म्हणून न पाहता, त्यातून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा ओळखण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
प्रशासन, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिकांचा समन्वय महत्त्वाचा
पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आणि नागरिक यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेत, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून आणि पारदर्शक पद्धतीने प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका कार्यरत राहील, असा विश्वास आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
चौकट : पुढील ५० वर्षांसाठी पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासाचा आराखडा
यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत, नियोजित आणि दीर्घकालीन विकासाचे विविध पैलू मांडले.
या सादरीकरणामध्ये पुढील महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता :
आगामी ५० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन
महापालिका हद्दीतील उंचावरील पाणीसाठ्यांचे नियोजन
पवना व इंद्रायणी नदीकाठ विकास प्रकल्प
ड्रेनेज मास्टर प्लॅन
पुढील २५ वर्षांसाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापन
महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित जागांची सद्यस्थिती व भविष्यातील विकास योजना
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास
शहरी नाले सुधारणा प्रकल्प
डीपी रस्त्यांचे नियोजन
डेटा सेंटर धोरण आराखडा
पार्किंग धोरण
शहराचे सुशोभीकरण आणि शहरी हरितीकरण
उद्यानांचा विकास व अद्ययावतीकरण
रुग्णालय सेवांचे बळकटीकरण
भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे
बल्क वेस्ट जनरेटरसाठी नोंदणीकृत भागीदारांमार्फत सुविधा
प्रतिभा शोध कार्यक्रम
अभ्यासिका व व्यायामशाळांची संख्या वाढविणे
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वाभिमान धोरण
सर्वांसाठी सुलभ पिंपरी चिंचवड
दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती
‘ऑपरेशन कायापालट’ अंतर्गत स्वच्छता गृह धोरण
क्रीडा सुविधांचा विस्तार
पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन
सायन्स पार्कचा विकास
महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण धोरण
सेवानिवृत्तीच्या दिवशी पेन्शन योजना
प्रशासकीय कार्यक्षमता व पारदर्शकता
सुशासन सुधारणा
‘स्वागतम ई-पास’ यांसारखे नागरिकाभिमुख उपक्रम
या विविध योजनांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचा दीर्घकालीन, पर्यावरणपूरक, नागरिककेंद्रित आणि शाश्वत विकास साधण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0