चेंबूरमधील माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह व ‘माँ’ रुग्णालयाची अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांची आकस्मिक पाहणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी चेंबूर येथील माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह आणि श्रीमती दिवालीबेन मेहता (माँ) सर्वसाधारण रुग्णालयाची आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांनी HMIS प्रणाली, रुग्णसेवा, रुग्णालयातील दुरुस्तीची कामे आणि वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई | दि. ८ जुलै २०२६
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी चेंबूर येथील माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह तसेच श्रीमती दिवालीबेन मेहता (माँ) सर्वसाधारण रुग्णालयाची आकस्मिक पाहणी करून रुग्णालयातील आरोग्य सुविधा, उपचार व्यवस्था आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
७ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या या पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रत्यक्ष संगणकावर तपासून प्रणालीची कार्यक्षमता पाहिली. तसेच या प्रणालीच्या प्रभावी वापराबाबत रुग्णालय प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी रुग्णालय परिसरातील रिक्त कर्मचारी निवासस्थाने आणि लगतच्या मोकळ्या भूखंडाचीही त्यांनी पाहणी केली. या जागांबाबत संबंधित विभागाने केलेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अतिरिक्त आयुक्तांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या, आगामी महिन्यात अपेक्षित प्रसूतींची माहिती तसेच उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. तसेच श्रीमती दिवालीबेन मेहता (माँ) सर्वसाधारण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदसंख्या, मनुष्यबळाची उपलब्धता आणि विविध विभागांच्या कार्यपद्धतीची माहितीही जाणून घेतली.
रुग्णालयात सुरू असलेली दुरुस्ती व डागडुजीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत उपचारासाठी दाखल रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि वेळेत औषधोपचार उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
या पाहणीवेळी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0