सायनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; २९ शासकीय विभागांचा सहभाग, ९१ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

सायन येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २९ शासकीय विभागांच्या सहभागातून ९१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर आणि मार्गदर्शन करण्यात आले.

Jul 22, 2026 - 22:17
 0  8
सायनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; २९ शासकीय विभागांचा सहभाग, ९१ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
सायन समाधान शिबिर, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर, मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सायन येथील समाज मंदिर हॉलमध्ये आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २९ शासकीय कार्यालयांनी सहभाग घेत विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, अप्पर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात आणि निवासी जिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी सायन कोळीवाडा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी असे लोकाभिमुख शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले. तर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर’ हा उपक्रम लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचवणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. पावसाळ्यात रक्तपेढ्यांमध्ये निर्माण होणारी कमतरता दूर करण्यासाठी नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

२९ शासकीय विभागांचा सहभाग; ९१ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ

या समाधान शिबिरामध्ये २९ शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला. त्यापैकी ९ विभागांमार्फत विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. एकूण ९१ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, क्रीडा साहित्य तसेच विविध शासकीय योजनांतील लाभांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय २० विभागांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. शिबिरात सायन परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध योजनांसाठी अर्ज सादर केले.

रक्तदान, आरोग्य तपासणी आणि सामाजिक उपक्रमांना प्रतिसाद

शिबिरात मोफत वैद्यकीय तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच वीर सावरकर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना सायकली आणि दिव्यांग नागरिकांना तीन चाकी सायकलींचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी अप्पर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ उपलब्ध करून देणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविणे हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1