व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या – मंत्री भरत गोगावले
व्हीबी जी राम जी’ योजनेतून गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी कामांची संख्या वाढवून मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबई, दि. २५ : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढविण्यासह मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
रोजगार हमी विभाग हा सर्वसामान्यांच्या हाताला काम देणारा आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणारा महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही पात्र नागरिकाला कामाची कमतरता भासू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मंत्री गोगावले यांनी केले.
‘व्हीबी जी राम जी’ योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री गोगावले यांनी विविध जिल्ह्यांमधील योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
नंदुरबारच्या कामगिरीचे कौतुक
‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले. तसेच अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, बुलढाणा, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये झालेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
ज्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी कामे सुरू आहेत, त्या जिल्ह्यांनी तातडीने कामांची संख्या वाढवून नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
३१८ प्रकारच्या कामांना सुविधा
या योजनेअंतर्गत आता ३१८ प्रकारची कामे घेण्याची सुविधा उपलब्ध असून, त्यामध्ये घरकुलांसह विविध विकासकामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि नागरिकांमध्ये योजनेबाबत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले.
शाळांमध्ये कंपाऊंडच्या भिंती, स्वच्छतागृहे तसेच इतर आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्याची कामेही या योजनेतून हाती घेता येणार आहेत. त्याचबरोबर आपत्ती निवारण, जलसंधारण आणि सिंचन विहिरी यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला.
मजुरीचे वेळेत वितरण करण्याचे निर्देश
योजनेअंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या मजुरीचे वेळेत वितरण होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले. शासनामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निधी उपलब्ध असतानाही मजुरीचे वितरण प्रलंबित राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मजुरांची ई-केवायसी पूर्ण करूनच काम देण्याचे निर्देश देतानाच उपस्थिती आणि कामांची अचूक नोंद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती
नरेगा अंतर्गत घरकुलांची प्रलंबित कामे आणि मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांनाही गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पीएमएवाय-२ अंतर्गत राज्याला सुमारे २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्याचे जिल्हानिहाय वाटप लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सुमारे २,८५० कोटी रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू असून हा निधी लवकरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
गावपातळीवर जाऊन लाभार्थ्यांशी संवाद साधा
ग्रामपंचायतींना दिलेली उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधावा. योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले.
योजनांच्या यशकथांना व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी पुस्तिका तयार करण्यात येणार असून, त्यासाठी सिंचनवाढीची आकडेवारी संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढील पाच वर्षांचा ‘विकसित ग्रामपंचायत आराखडा’ तयार करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही मंत्री भरत गोगावले यांनी बैठकीत केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0