युवकांनी एचआयव्ही/एड्समुक्तीचे दूत बनावे – डॉ. सुनील भोकरे

कोल्हापुरात राज्यस्तरीय रेड रन, रेड रिबन प्रश्नमंजुषा आणि इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेनचा शुभारंभ. युवकांनी एचआयव्ही/एड्सविषयी शास्त्रीय माहिती घेऊन समाजात जनजागृती करावी, असे आवाहन डॉ. सुनील भोकरे यांनी केले.

Aug 23, 2026 - 23:50
 0  8
युवकांनी एचआयव्ही/एड्समुक्तीचे दूत बनावे – डॉ. सुनील भोकरे
डॉ. सुनील भोकरे, एचआयव्ही एड्स, एड्समुक्त महाराष्ट्र, रेड रन, रेड रिबन प्रश्नमंजुषा, इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २३ : देशाच्या शाश्वत विकासासाठी एचआयव्ही/एड्समुक्त समाज निर्माण करणे ही महत्त्वाची जबाबदारी असून, या अभियानात युवकांची भूमिका निर्णायक आहे. युवा पिढीने एचआयव्ही/एड्सविषयी सखोल व शास्त्रीय माहिती आत्मसात करून ती समाजापर्यंत पोहोचवावी आणि ‘एचआयव्हीमुक्तीचे दूत’ म्हणून कार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय रेड रन, रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि राज्यस्तरीय इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेनच्या शुभारंभप्रसंगी डॉ. भोकरे बोलत होते.

‘रेड रन’ म्हणजे एड्समुक्त समाजासाठीची धाव

डॉ. सुनील भोकरे म्हणाले की, रेड रन ही केवळ शारीरिक क्षमता सिद्ध करणारी स्पर्धा नसून एचआयव्ही/एड्समुक्त समाजासाठीची धाव आहे. मॅरेथॉन, प्रश्नमंजुषा, फ्लॅश मॉब, लोककला आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आजच्या काळात युवकांचा सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवरील प्रभाव मोठा आहे. त्यामुळे युवकांनी या माध्यमांचा सकारात्मक वापर करून एचआयव्ही/एड्सविषयी अचूक आणि शास्त्रीय माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

तपासणी, उपचार आणि सातत्याबाबत जनजागृती आवश्यक

राष्ट्रीय एचआयव्ही नियंत्रणातील 95:95:95 हे महत्त्वपूर्ण लक्ष्य साध्य करण्यासाठी एचआयव्ही तपासणी, उपचार आणि उपचारातील सातत्य याबाबत जनजागृती वाढविणे आवश्यक असल्याचे डॉ. भोकरे यांनी सांगितले.

एचआयव्हीसह जगणारी व्यक्ती नियमित उपचार घेतल्यास सामान्य आणि निरोगी आयुष्य जगू शकते. त्यामुळे एचआयव्हीबाबत भीती किंवा गैरसमज न ठेवता वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि भेदभावमुक्त दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी एड्समुक्तीसाठी युवकांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर डॉ. नागनाथ मुदाम यांनी प्रास्ताविकातून राज्यात एचआयव्ही/एड्स नियंत्रण आणि जनजागृतीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

रेड रनमध्ये कोल्हापूरचा दबदबा

राज्यस्तरीय रेड रन स्पर्धेत युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

रेड रन – मुले

प्रथम : प्रवीण कांबळे – कोल्हापूर

द्वितीय : अभिषेक देवकाते – कोल्हापूर

तृतीय : कार्तिककुमार करिहरपाल – नाशिक

उत्तेजनार्थ : कृष्णा गायक – अहिल्यानगर

रेड रन – मुली

प्रथम : सुकन्या शिवणे – कोल्हापूर

द्वितीय : स्नेहल खरात – कोल्हापूर

तृतीय : प्रणाली शेगोकार – बुलढाणा

उत्तेजनार्थ : ऋतिका नांदेवार – वाशीम

या निकालातून रेड रन स्पर्धेत कोल्हापूरच्या युवक-युवतींचा दबदबा दिसून आला.

रेड रिबन प्रश्नमंजुषेत साताऱ्याच्या संचिता हात्ते प्रथम

एचआयव्ही/एड्स, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य, तपासणी, उपचार आणि सामाजिक जागरूकता या विषयांवर आधारित राज्यस्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विजेते :

प्रथम : कु. संचिता हात्ते – सातारा

द्वितीय : कु. अस्मि जोशी – बुलढाणा

तृतीय : कु. कुलदीप लांडे – यवतमाळ

उत्तेजनार्थ : कु. अर्जुन जायभये – अकोला

राज्यभर राबविणार इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेन

नॅको, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेन राज्यभर राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून गावपातळीवर, शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच विविध समुदायांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आणि जनजागृतीपर उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

या अभियानाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून गैरसमज दूर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती पोहोचविणे, तपासणी व उपचारासाठी प्रोत्साहन देणे तसेच एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींवरील कलंक आणि भेदभाव कमी करणे हा आहे, अशी माहिती डॉ. भोकरे यांनी दिली.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा जिल्ह्यांचा गौरव

सन २०२५-२६ मध्ये इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेनची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हिंगोली, अमरावती, सातारा, जळगाव, पालघर आणि नागपूर या सहा जिल्ह्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या जिल्ह्यांनी एचआयव्ही/एड्स जनजागृती, समुदाय सहभाग आणि विविध माहिती, शिक्षण व संवादात्मक (IEC) उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची यावेळी दखल घेण्यात आली.

लोककला आणि फ्लॅश मॉबमधून जनजागृती

कार्यक्रमात अमरावतीच्या गंधर्व बहुउद्देशीय संस्थेने लोककलेचे सादरीकरण करून एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती केली. तसेच NITच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, डॉ. सरिता थोरात, डॉ. नागनाथ मुदाम, डॉ. कपिलदेव पाटील, डॉ. राहुल जाधव, डॉ. लोकेश गभणे, जगदीश पाटील, डॉ. योगेश साळे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक, विद्यार्थी, युवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.