आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर; २१ व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर येथे २१ व्या परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ चे उत्साहात उद्घाटन झाले. गुन्हे प्रतिबंध, वैज्ञानिक तपास, सायबर सुरक्षा आणि पोलीस कार्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर मान्यवरांनी भर दिला.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. ३ (जिमाका) : बदलत्या तांत्रिक युगात पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन, वैज्ञानिक तपास पद्धती आणि सायबर सुरक्षेसारख्या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करून अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रसज्ज होणे ही काळाची गरज असल्याचा सूर २१ व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ च्या उद्घाटन समारंभात उमटला.
या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्र-कुलगुरू ज्योती जाधव तसेच अपर पोलीस अधीक्षक अण्णा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर परीक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभाग नोंदविला.
कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी पोलीस कर्तव्य मेळाव्यासारख्या उपक्रमांमुळे पोलीस दलाचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. अशा मेळाव्यांमधून
विविध जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण होते. त्यातून तपास प्रक्रियेत अधिक गुणवत्ता, अचूकता आणि परिणामकारकता निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस कर्तव्य मेळावा हा पोलीस दलाच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले.
गुन्हे प्रतिबंध आणि गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, वैज्ञानिक तपास पद्धती, पोलीस छायाचित्रण, व्हिडीओग्राफी, संगणक जागरूकता आणि श्वानपथकाचा प्रभावी वापर करणे आता आवश्यक बनले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धकांनी या मेळाव्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करावे आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही विशेष पोलीस महानिरीक्षक शर्मा यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था आणि सायबर सुरक्षेसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. डिजिटल व्यवहार आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक जटिल होत असून, नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलीस दल हे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारे यंत्रणा नसून समाजात न्याय, सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करणारी एक जबाबदार संस्था असल्याचे अधोरेखित केले.
सायबर गुन्हे, डिजिटल पुरावे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सातत्याने अद्ययावत राहणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आधुनिक तपास कौशल्ये आत्मसात करणे ही पोलीस दलाची महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचे विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकातून सुरक्षा व्यवस्थेतील नियोजन, समन्वय आणि तातडीच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्ह्यातील पोलीस अंमलदार आकाश काशिद यांनी अवघ्या काही मिनिटांत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे रेखाचित्र साकारले. त्यांच्या या कलाकृतीने उपस्थितांची विशेष वाहवा मिळविली.
कार्यक्रमाच्या शेवटी अपर पोलीस अधीक्षक अण्णा जाधव यांनी उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धकांचे आभार मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0