गारगोटीला मेडिकल हब बनविणार; अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे नागरिकांसाठी नवे पर्व – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन, 2D इको, 300 MA डिजिटल एक्स-रे आणि ट्रू-नॉट मशीनसह अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. गारगोटीला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

Aug 3, 2026 - 20:02
 0  12
गारगोटीला मेडिकल हब बनविणार; अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे नागरिकांसाठी नवे पर्व – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
गारगोटी मेडिकल हब, प्रकाश आबिटकर, गारगोटी उपजिल्हा रुग्णालय

प्रतिनिधी:उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. ३ (जिमाका) : भुदरगड तालुक्यासह परिसरातील इतर तालुक्यांतील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या आधुनिक सुविधांमुळे भुदरगड तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे पर्व सुरू झाले आहे.

यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, गारगोटी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर, गटविकास अधिकारी शेखर जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, यापूर्वी हृदयविकाराचा झटका, गंभीर अपघात किंवा सीटी स्कॅनसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्यांसाठी रुग्णांना कोल्हापूरला जावे लागत होते. मात्र, गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी आता दूरवर जाण्याची गरज राहणार नाही.

या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती आणि गंभीर आजारांचे अचूक निदान करण्यासाठी अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीन, हृदयविकार आणि हृदयाशी संबंधित आजारांच्या तपासणीसाठी 2D इको मशीन, डिजिटल आणि अधिक स्पष्ट क्ष-किरण तपासणीसाठी 300 MA डिजिटल एक्स-रे मशीन, तसेच जलद वैद्यकीय चाचण्या आणि निदानासाठी ट्रू-नॉट मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत.

या अद्ययावत वैद्यकीय सुविधांमुळे भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, गंभीर आजारांचे तातडीने निदान करणे शक्य होणार आहे. रुग्णांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होणार असून, प्रत्येक रुग्णाला स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये १५ ऑगस्टनंतर आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही सुविधा सुरू झाल्यानंतर नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सांगली, मिरज किंवा कोल्हापूर येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

राज्यातील रुग्णालयांमध्ये कर्करोग रुग्णांच्या निदानासाठी पेट स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

गारगोटी येथील ५० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० बेडच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राधानगरी, सोळांकूर आणि तारळे येथील रुग्णालयांचेही श्रेणीवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री आबिटकर यांनी दिली.

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात भविष्यात कॅथलॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित तपासण्या आणि उपचारांसाठी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सुविधेमुळे गारगोटी परिसरातील आरोग्य सेवांची क्षमता अधिक मजबूत होणार आहे.

नुकतेच पुणे जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले असून, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर, डॉ. चरित भोजराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि अमित धारक यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गारगोटीचे सरपंच व उपसरपंच, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.