कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती; म्हाडाचा भगीरथी हाऊसिंग आणि माथी डेव्हलपर्ससोबत C&DA करार
ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाचा भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्ससोबत C&DA करार झाला असून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. १७ सप्टेंबर २०२६ : मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत (MBRRB) Construction & Development Agency (C&DA) पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत C&DA करार करण्यात आला.
या करारामुळे प्रकल्पाने नियोजनाच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी म्हाडा व मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स प्रा. लि.चे संचालक व विकासकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऐतिहासिक ओळख जपत आधुनिक परिसर उभारण्याचा प्रयत्न
यावेळी संजीव जयस्वाल यांनी मंडळाचे अधिकारी आणि विकासकांना शुभेच्छा दिल्या. C&DA करारामुळे कामाठीपुरा पुनर्विकासाने नियोजनाच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांचे सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक जीवनमान हे प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असून, कामाठीपुराची ऐतिहासिक ओळख जपत आधुनिक, शाश्वत आणि नागरिककेंद्रित परिसर उभारण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून प्रकल्प पुढे नेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
३४ एकर क्षेत्रात समूह पुनर्विकास
कामाठीपुरा हा मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसरातील सुमारे शंभर वर्षे जुन्या इमारती, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि कालानुरूप अपुऱ्या ठरलेल्या पायाभूत सुविधांमुळे परिसराच्या सर्वंकष पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे.
त्यामुळे स्वतंत्र इमारतींची पुनर्बांधणी करण्याऐवजी संपूर्ण परिसराचा एकात्मिक, नियोजित आणि समूह पद्धतीने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुमारे ३४ एकर क्षेत्रात, गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पात सुमारे ४७५ उपकरप्राप्त आणि २५९ बिगर-उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. उपलब्ध प्रकल्प आराखड्यानुसार सुमारे ८,००१ निवासी व व्यावसायिक भाडेकरू/रहिवासी, त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ बिगरनिवासी भाडेकरू, तसेच सुमारे ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी संबंधित आहेत.
कामाठीपुरातील भूखंड आकाराने लहान व अरुंद असल्यामुळे स्वतंत्र इमारतींच्या पुनर्विकासाऐवजी समूह पुनर्विकासातून एकात्मिक नियोजन करणे शक्य होणार आहे.
DCPR-2034 अंतर्गत प्रकल्प
कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प DCPR-2034 मधील विनियम 33(9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून दर्जा देण्यात आला आहे.
जून २०२५ मध्ये म्हाडाने C&DA नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर शासनाने ६ एप्रिल २०२६ रोजी निविदा स्वीकारून संबंधित विकासकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली. ८ एप्रिल २०२६ रोजी अटी व शर्तींच्या अधीन राहून देकारपत्र देण्यात आले.
पात्रता निश्चिती, क्षेत्र निश्चिती तसेच रहिवासी आणि जमीनमालकांची संमती यासाठी प्रकल्प व्यवहार्यता समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पात्र रहिवाशांना ५०० चौ.फु. पुनर्वसन सदनिका
या पुनर्विकास प्रकल्पातून विद्यमान पात्र रहिवासी आणि भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्यात येणार आहे. पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक गाळेधारकांच्या पुनर्वसनाचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय कामाठीपुरा समूह पुनर्विकासातून म्हाडासाठी सुमारे ४४,००० चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, त्यातून सुमारे ९०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती प्रस्तावित आहे.
आधुनिक नागरी सुविधांचा समावेश
प्रस्तावित विकासामध्ये पुनर्वसन इमारतींसोबत निवासी व व्यावसायिक क्षेत्र, सार्वजनिक सुविधा, मनोरंजनासाठी खुल्या जागा, हरित क्षेत्र, अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक नागरी पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आधुनिक व भूकंपरोधक बांधकाम तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक वास्तुरचना, पावसाच्या पाण्याचे संधारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्रे, आधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था आणि लिफ्ट सुविधा यांसह आवश्यक सामाजिक व नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
नागरिकांच्या सूचना आणि सहभागाला महत्त्व
११ सप्टेंबर २०२६ रोजी कामाठीपुरा विकास समितीच्या सहकार्याने नियोजित आराखड्याचे सादरीकरण आणि जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, भाडेकरू, जमीनमालक आणि विविध घटकांच्या प्रतिनिधींना प्रस्तावित प्रकल्पाची माहिती देण्यात आली.
प्रकल्पाच्या वास्तुविशारदांनी प्रकल्पाची संकल्पना, व्याप्ती, पुनर्वसनाचे नियोजन, प्रस्तावित सुविधा आणि भविष्यातील विकासाची दिशा यांचे सविस्तर सादरीकरण केले. नागरिकांनी यावेळी आपल्या सूचना, अपेक्षा आणि प्रश्न मांडले. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक माहिती दिली.
पुनर्विकास प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि विश्वास या बाबींना विशेष महत्त्व देण्यात येत असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.
रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे
पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान रहिवासी, व्यावसायिक गाळेधारक आणि जमीनमालकांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे तसेच पुढील एक वर्षाचे धनादेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थलांतर आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी एकवेळ २५ हजार रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
बिगरनिवासी गाळेधारकांसाठी क्षेत्रफळानुसार वाढीव भाड्याची तरतूद करण्यात आली असून, २०० चौ.फु.पर्यंत २५ हजार रुपये, २०० ते ४०० चौ.फु. क्षेत्रासाठी ३० हजार रुपये आणि ४०० चौ.फु.पेक्षा अधिक क्षेत्रासाठी ३५ हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच जमीनमालकांना पुनर्विकास कालावधीत प्रति प्लॉट २५ हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
C&DA करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, ऐतिहासिक कामाठीपुराच्या पुनर्विकास प्रक्रियेला यामुळे महत्त्वाचा टप्पा प्राप्त झाला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0