कोल्हापूरला मिळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. ३५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियममध्ये क्रिकेटसह विविध खेळांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असून, क्रीडा पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.

Jul 21, 2026 - 22:36
 0  13
कोल्हापूरला मिळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, सामंजस्य करार, क्रीडा विभाग, बीसीसीआय, आयसीसी, मल्टी स्पोर्ट्स हब, क्रिकेट म्युझियम, क्रीडा सुविधा, क्रीडा पर्यटन, विकासवाडी,

मुंबई | प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व सुरू करणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या प्रकल्पामुळे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार असून, राज्यातील क्रीडा विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसचिव आबासाहेब कवळे, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे, तसेच असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे अत्याधुनिक स्टेडियम

करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथे असलेली १२.७६ हेक्टर (३१.९० एकर) शासकीय जागा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि संबंधित क्रीडा सुविधा उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सामंजस्य कराराअंतर्गत हस्तांतरित करण्यात आली.

BCCI आणि ICC च्या निकषांनुसार सुमारे ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे आधुनिक स्टेडियम उभारण्यात येणार आहे.

क्रिकेटपुरते मर्यादित नाही; मल्टी स्पोर्ट्स हबची संकल्पना

हा प्रकल्प केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित केला जाणार आहे. येथे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग यांसारख्या विविध खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

याशिवाय आधुनिक पॅव्हेलियन, सराव मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट व्यवस्था, क्रिकेट म्युझियम, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

स्थानिक खेळाडूंना मोठी संधी

या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह ग्रामीण भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार असल्याने स्थानिक खेळाडूंना मोठा लाभ मिळणार आहे.

क्रीडा पर्यटन आणि रोजगाराला चालना

या स्टेडियममुळे क्रीडा पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग, वाहतूक आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. त्यामुळे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेलाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली.

राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याच्या शासनाच्या धोरणाला या प्रकल्पामुळे बळ मिळणार असून, कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला नवी दिशा देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0