जलसंधारणासाठी २१ ऑगस्टला राज्यभर ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’
शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची थीम असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबई, दि. १३ ऑगस्ट २०२६ : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाची ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही थीम असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य आहे.
२१ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमाल ३ किलोमीटरपर्यंत ‘महा वॉकेथॉन’ आयोजित करून सहभागी नागरिकांकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह
शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे.
मुंबईत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी करतील. या उपक्रमासाठी विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
विद्यार्थी, युवक आणि विविध संस्थांचाही सहभाग
‘महा वॉकेथॉन’मध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काउट्स अँड गाइड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, सायकलिंग क्लब, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, व्यायामशाळा तसेच महिला आणि राज्यातील नागरिक सहभागी होणार आहेत.
QR कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी
महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी QR कोड आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २१ ऑगस्टच्या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सोशल मीडियावर #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater या हॅशटॅगचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युवकांसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. Instagramच्या माध्यमातून मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून आपल्या Public Instagram Account वर पोस्ट करायची आहे. Reelच्या सुरुवातीला तिचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक असून, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Accountला Tag करणे तसेच अधिकृत #SaveSoilSaveWater हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि पारंपरिक जलसंधारण पद्धती यांसारख्या विविध विषयांवर Reels तयार करता येणार आहेत. Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone Visuals अशा विविध सर्जनशील पद्धतींचा वापर करता येणार आहे.
जिल्हानिहाय बक्षिसे
Reel स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता आणि Instagram Engagement या निकषांवर एकूण १०० गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि सोशल मीडिया सहभाग यांचा समतोल साधला जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० Reels आणि राज्यभरातून १० हजारांहून अधिक Reels तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व गौरवचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागीांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.
शाळा-महाविद्यालयांतही जलसंधारण जनजागृती
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या जलसंधारण अभियानाच्या कालावधीत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व पोस्टर, वाद-विवाद स्पर्धा, ‘एक शाळा-एक शोषखड्डा’ उपक्रम, जलमित्र किंवा जलदूत नियुक्ती अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना तसेच उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0