चिखली घरकुल परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी महापौर रवी लांडगे यांची पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
चिखली घरकुल परिसरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या समस्येची महापौर रवी लांडगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी केली. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिखली येथील घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी गुरुवारी (दि. १६ जुलै) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत परिसराची सविस्तर पाहणी केली. यावेळी पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यापूर्वी नागरिकांशी संवाद साधताना महापौरांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह पुन्हा पाहणी करून समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर शाश्वत उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने जलनिस्सारण, स्थापत्य, पाणीपुरवठा तसेच इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान पाणी साचण्यामागील तांत्रिक कारणांचा सखोल आढावा घेण्यात आला. पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक जलनिस्सारण व्यवस्था, नाले व जलवाहिन्यांची क्षमता, अडथळे दूर करणे तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
महापौर रवी लांडगे यांनी नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगत आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
या पाहणीवेळी फ प्रभाग अध्यक्षा शिवानी नरळे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, निलेश नेवाळे, नगरसदस्या योगिता नागरगोजे, रिटा सानप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, हरविंदर बन्सल, सोहन निकम आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0