म्हाडाच्या २१ व्या लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी
म्हाडाच्या २१ व्या लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. जोगेश्वरी व प्रभादेवीतील पुनर्वसन सदनिकांच्या प्रश्नांवर संजीव जयस्वाल यांनी निर्देश दिले.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. १७ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित २१ व्या लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात हा लोकशाही दिन पार पडला.
जोगेश्वरीतील पुनर्वसन सदनिकेच्या प्रश्नावर निर्देश
लोकशाही दिनात जोगेश्वरी पश्चिम येथील मातेश्वरी गृहनिर्माण संस्थेतील झोपडीच्या बदल्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) योजनेअंतर्गत विकासकाकडून मिळणाऱ्या पुनर्वसन सदनिकेबाबत श्रीमती रुकसाना बेगम यांनी अर्ज केला.
सदर पुनर्वसन सदनिकेत घुसखोरी झाल्याने निष्कासनाची कार्यवाही करून सदनिका मिळावी, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. या प्रकरणी संजीव जयस्वाल यांनी शिखर तक्रार निवारण समितीने सदनिका क्रमांक ४१३ व ६०५ यांचे एकत्रित निष्कासन करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे नमूद केले. त्यानुसार संबंधितांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले.
या प्रकरणी उपजिल्हाधिकारी, विशेष घटक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, सक्षम प्राधिकारी, म्हाडा मुंबई मंडळाचे भूव्यवस्थापक आणि अर्जदार यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबर २०२६ रोजी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही निर्देश देण्यात आले.
प्रभादेवीतील पुनर्वसन सदनिकेच्या ताब्यासाठी विशेष सुनावणी
प्रभादेवी येथील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतरही पुनर्वसन सदनिकेचा ताबा संबंधित विकासकाने दिलेला नसल्याची तक्रार श्री. चंद्रकांत चव्हाण यांनी लोकशाही दिनात केली. पुनर्वसन सदनिकेचा ताबा मिळावा, या मागणीसाठी त्यांनी अर्ज सादर केला.
या अर्जावर सुनावणी करताना संजीव जयस्वाल यांनी संबंधित प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, विकासक आणि अर्जदार यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष सुनावणी स्वतः घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या गृहनिर्माण व पुनर्वसनाशी संबंधित तक्रारींवर थेट सुनावणी घेऊन त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया म्हाडाकडून राबविण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1