GPR 2.0 अंतर्गत म्हाडाकडून डिजिटल प्रशासनाला गती; ‘CFC @ Home’ आणि ‘Visitor Management System’ सुविधांचे लोकार्पण
महाराष्ट्र शासनाच्या GPR 2.0 उपक्रमांतर्गत म्हाडाने नागरिकांसाठी ‘CFC @ Home’ आणि ‘Visitor Management System’ या दोन डिजिटल सुविधा सुरू केल्या आहेत. नागरिकांना घरबसल्या अर्ज, तक्रारी, कागदपत्रे सादर करणे आणि अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ऑनलाइन वेळ निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. २५ मे : महाराष्ट्र शासनाच्या GPR 2.0 (Governance Performance and Reforms 2.0) या प्रशासकीय सुधारणा उपक्रमांतर्गत म्हाडाने नागरिकाभिमुख डिजिटल प्रशासनाला गती देत ‘CFC @ Home’ आणि ‘Visitor Management System’ या दोन महत्त्वपूर्ण डिजिटल सुविधांचे लोकार्पण केले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या संगणकीय प्रणालींचे अनावरण करण्यात आले.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित ‘गो लाईव्ह’ कार्यक्रमात अद्ययावत करण्यात आलेली ‘CFC @ Home’ प्रणाली आणि अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ऑनलाइन वेळ निश्चित करण्यासाठी ‘Visitor Management System’ ही सुविधा आजपासून कार्यान्वित करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या GPR 2.0 धोरणानुसार शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने म्हाडाने नागरिकांना अधिक वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
यावेळी बोलताना संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, म्हाडा ही सामाजिक बांधिलकी जपत नागरिककेंद्रित सेवा देणारी आधुनिक आणि उत्तरदायी संस्था बनावी, हा प्रशासनाचा उद्देश आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून प्रशासन अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.
‘CFC @ Home’ सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या अथवा कुठूनही विविध अर्ज, तक्रारी आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून थेट म्हाडाकडे पाठवता येणार आहेत. तसेच संबंधित अर्ज, फाईल किंवा प्रक्रियेची सद्यस्थिती डिजिटल माध्यमातून पाहता येणार असून शुल्क भरण्याची सुविधाही ऑनलाइन उपलब्ध असणार आहे.
यामुळे नागरिकांना म्हाडा कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता कमी होणार असून वेळेची बचत होणार आहे. तसेच त्यांनी दाखल केलेल्या कामांचा ऑनलाइन पाठपुरावाही करता येणार आहे.
याशिवाय नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘Visitor Management System’ द्वारे नागरिकांना म्हाडा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे. या प्रणालीमध्ये अभ्यागत नोंदणी, भेट वेळ निश्चिती, मंजुरी प्रक्रिया, प्रवेश व्यवस्थापन आणि अभ्यागतांच्या हालचालींचे निरीक्षण केंद्रीकृत डिजिटल प्रणालीद्वारे केले जाणार आहे.
अधिकारी बैठकीत व्यस्त असल्यास किंवा रजेवर असल्यास त्याची माहिती मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना मिळणार आहे. तसेच अपॉइंटमेंटची वेळ बदलण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांसाठी ‘Visitor Management System’ हे स्वतंत्र अँड्रॉइड मोबाईल ॲपही उपलब्ध करण्यात आले आहे.
यावेळी म्हाडाचे सचिव प्रफुल्ल ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले तसेच मुख्य माहिती व संचार अधिकारी सविता बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
म्हाडाकडून सुरू करण्यात आलेल्या या नव्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यासोबतच नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0