मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ व्यक्तींच्या नातेवाईकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
पुणे | प्रतिनिधी : रोहन सोनाळे
मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ व्यक्तींच्या नातेवाईकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मदतीसंदर्भातील सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
८ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजता मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे बचावकार्य राबविले.
दुर्घटना घडल्यानंतर पाच नागरिक स्वतः बाहेर पडले, तर अडकलेल्या १८ जणांपैकी नऊ जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत भावेश वाणी (३३), अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२), राहुल गायकवाड (२३) आणि वामन कसबे (५०) या नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0