मोशी कचरा डेपो दुर्घटना : दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण करत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची, मृतांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची, तसेच कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याची जोरदार मागणी केली.

Jul 12, 2026 - 06:37
 0  8
मोशी कचरा डेपो दुर्घटना : दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले
मोशी कचरा डेपो, मोशी दुर्घटना, यशवंतभाऊ भोसले, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, कामगार आंदोलन,

पुणे| प्रतिनिधी | रोहन सोनाळे 

दि. ११ जुलै २०२६

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या प्रशासनातील अधिकारी आणि संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच मृतांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी शनिवारी (दि. ११) पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, महापालिका नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करत असताना कचरा संकलन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारखी कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. काही ठेकेदार, दलाल आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ही व्यवस्था सुरू ठेवण्यात आली असून ती कामगारांच्या जीवाशी खेळणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगारांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनासाठी लज्जास्पद घटना असल्याचे सांगत, मृत कामगारांना जिवंतपणी आवश्यक सुरक्षा साहित्य, गणवेश, वैद्यकीय सुविधा किंवा नियमित आरोग्य तपासणीदेखील उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, अशी टीका त्यांनी केली. अनेक वर्षे कचऱ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत असतानाही त्यांच्या आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुर्घटनेनंतर प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत असणे अपेक्षित असताना प्रशासनाकडे केवळ "सेटिंग मॅनेजमेंट" असल्याची टीका भोसले यांनी केली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली इमारत बेकायदेशीर होती. एका मजल्याची परवानगी असताना दोन मजली इमारत उभारण्यात आली आणि त्यामध्ये प्रशासनाचे कर्मचारी व कंत्राटी कामगार कार्यरत होते. ही बाब प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

मोशी कचरा डेपोवरील आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, तांत्रिक कर्मचारी नियुक्त न करणे आणि नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प अनेक महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप त्यांनी केला. अत्याधुनिक यंत्रसामग्री असूनही कचऱ्याचे डोंगर कमी करण्याचे काम रखडल्याने या दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे स्वागतार्ह असले, तरी त्याने गमावलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे प्रत्येक मृत कामगाराच्या वारसाला तातडीने महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या आदेशाने विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

भोसले यांनी पुढे सांगितले की, कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करून सर्व कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे. त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, ईएसआय, आरोग्य सुविधा, वार्षिक वैद्यकीय तपासणी आणि इतर सर्व सेवा लाभ देण्यात यावेत. केवळ पंचनामे आणि पाहणी करून प्रशासनाने जबाबदारी झटकू नये, तर दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सुमारे साडेतीन हजार सभासदांच्या वतीने "समान काम, समान वेतन" आणि कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती देत, पुढील १५ दिवसांत महापालिका आयुक्तांनी संघटनेशी सकारात्मक चर्चा केली नाही, तर हजारो कामगारांसह कचरा वाहने घेऊन महापालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यशवंतभाऊ भोसले यांनी दिला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0