फक्त कुंभमेळा नव्हे, पुढील शंभर वर्षांचा नाशिक घडवतोय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीर्घकालीन विकासाची ग्वाही

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या पुढील शंभर वर्षांच्या विकासाचा पाया रचला जात असून, स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा आणि सुमारे ३२ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांतून आधुनिक, सुरक्षित व सक्षम नाशिक घडविण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Aug 1, 2026 - 17:27
 0  13
फक्त कुंभमेळा नव्हे, पुढील शंभर वर्षांचा नाशिक घडवतोय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीर्घकालीन विकासाची ग्वाही
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा, एकनाथ शिंदे, नाशिक विकास, सिंहस्थ २०२७, कुंभमेळा नियोजन, ३२

मनिषा गुरव :- चीफ एडिटर

मुंबई, दि. ३१ : सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या पुढील अनेक दशकांच्या विकासाचा भक्कम पाया ठरणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या आधुनिक पायाभूत सुविधा, सक्षम प्रशासन व्यवस्था, स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा आणि सुमारे ३२ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांमधून पुढील शंभर वर्षांचा नाशिक घडविण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दिव्य मराठी आयोजित ‘वसा सिंहस्थाचा... वारसा नाशिकचा... गौरव महाराष्ट्राचा’ या सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, दिव्य मराठीचे संचालक गिरीश अग्रवाल, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. रत्नाकर राऊतकर, कल्कीराम महाराज, जयंत सोनी, अंजन बलोदिया, भाऊ चौधरी यांच्यासह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, साधू-संत, आखाड्यांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंहस्थावर कॉन्क्लेव्ह आयोजित करणे ही सामाजिक बांधिलकी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विकास आणि पर्यावरण यांसारख्या विषयांवर अनेक कॉन्क्लेव्ह आयोजित केले जातात. मात्र, सिंहस्थासारख्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयावर कॉन्क्लेव्ह आयोजित करण्याचे धाडस दिव्य मराठीने केले आहे.

हा उपक्रम केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी दर्शविणारा आहे. बातम्यांपलीकडे जाऊन भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक अधिष्ठानाला बळ देण्याचे काम दिव्य मराठीने केले असून, संस्थेने खऱ्या अर्थाने ‘दिव्य’ कार्य केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील शिलेदारांचा गौरव करण्यात आला. आगामी सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, आखाडे, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

प्रयागराज महाकुंभाच्या नियोजनाचा नाशिकसाठी अभ्यास

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना सिंहस्थाच्या प्राथमिक नियोजनासाठी पहिली बैठक त्यांनी घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सिंहस्थाच्या तयारीचा सातत्याने आढावा घेण्यात आला.

प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभाच्या नियोजनाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना तेथे पाठविण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून प्रयागराजमधील गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यात आली. या अनुभवाचा उपयोग नाशिक सिंहस्थाचे नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र प्राधिकरण आणि स्वतंत्र कायद्याची व्यवस्था

सिंहस्थासाठी केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या सुविधा उभारण्याऐवजी दीर्घकालीन आणि सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा आणि स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती आणि मंत्री समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचे व्यवस्थापन एखाद्या व्यक्तीवर अवलंबून न राहता सक्षम आणि दीर्घकालीन संस्थात्मक व्यवस्थेवर आधारित असेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

३२ हजार कोटींच्या विकासकामांचे नियोजन

सिंहस्थासाठी निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुमारे ३२ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे.

हा निधी केवळ कुंभमेळ्याच्या कालावधीपुरता खर्च केला जाणार नसून नाशिकच्या कायमस्वरूपी विकासासाठी त्याचा उपयोग होणार आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि विविध पायाभूत प्रकल्पांमुळे नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१२ कोटी भाविकांसाठी आधुनिक नियोजन

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज असून एवढ्या मोठ्या संख्येतील भाविकांचे नियोजन आणि व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

प्रयागराजच्या तुलनेत नाशिकमध्ये उपलब्ध जागा कमी असल्याने येथे नियोजन अधिक आव्हानात्मक आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्यामुळे मुसळधार पाऊस, पूरस्थिती, वादळ, वाहतूक कोंडी, गर्दी नियंत्रण, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद यासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.

संपूर्ण व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असून भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

साधूग्रामसाठी १,४५० एकर क्षेत्र विकसित करणार

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्याकरिता सुमारे १,४५० एकर क्षेत्र विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी साधू-संत, विविध आखाडे आणि भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

“दिव्य, भव्य, सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र कुंभ” घडविण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून, सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाला नवी उंची देईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

नाशिकसाठी युनिफाईड डीसीपीआरची तरतूद

नाशिकच्या दीर्घकालीन विकासाशी संबंधित आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे आणि पुण्याप्रमाणे नाशिकसाठीही युनिफाईड डीसीपीआरच्या तरतुदी लागू करण्यात येतील, असे सांगितले.

सरकारची भूमिका ‘बघू, पाहू’ अशी नसून आवश्यक विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची आहे. ‘ऑन द स्पॉट डिसिजन’ घेऊन विकासकामांना गती देण्याची सरकारची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विकास प्रकल्पांना दिली गती

भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचाही आढावा घेतला. २०२२ नंतर राज्यातील बंद असलेले सण-उत्सव आणि मंदिरे पुन्हा सुरू करण्यात आली. रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यात आले.

अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग आणि मेट्रोसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात आले. उद्योग गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली आहे. सिंगल विंडो क्लिअरन्समुळे उद्योगांना गती मिळाली असून महाराष्ट्राने विकासाचा वेग कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

“आमचा अजेंडा सत्ता किंवा खुर्ची नाही; महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हा आमचा उद्देश आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचा विकास पुढील अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सिंहस्थाच्या यशासाठी शासन, प्रशासन, समाज आणि माध्यमांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

दिव्य मराठीच्या ‘सत्य सांगू बिनधास्त’ या भूमिकेचे कौतुक करत अशा विधायक उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला नवी उंची मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.